सातारा : जिल्ह्यातील वडूथ येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे माहेरी आलेल्या एका महिलाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीसह कृष्णा नदीत उडी घेतली आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 27 जुलै रोजी ही घटना घडली असून मुलीचा मृतदेह सापडला आहे. कृष्णेच्या पात्रात उडी घेतलेली महिला मात्र अद्याप बेपत्ता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सातारा जिल्ह्यातील वडूथ येथील आहे. येथे संचिता साळुंखे (वय 22 वर्षे) नावाची एक महिला काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आली होती. माहेरी येताना या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीला सोबत आणले होते. याच महिलने 27 जुलै रोजी आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह कृष्णा नदीत उडी मारली आहे.
महिलेने कृष्णा नदीपात्रात उडी घेतल्याचे समजताच या परिसरात एकच खळबळ उडाली. कृष्णेच्या पात्रात सध्या शोधमोहीम चालू आहे. दोन वर्षीय मुलीचा मृतदेह शोधण्यात यश आलं आहे. पण महिला अद्याप बेपत्ता आहे. गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय. मुसळधार पावसामुळे कृष्णेच्या पात्रात झपाट्याने वाढ होत आहे. सध्या या नदीची पाणीपातळी तब्बल 40 फुटांवर पोहोचली आहे. असे असताना पाण्याच्या प्रवाहात या महिलेचा शोध घेताना अनेक अडचणी येत आहेत. भविष्यातही कृष्णा नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे. असे असताना या महिलेचा शोध घेण्यात यश येणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
कृष्णा नदीच्या पात्रता उडी घेतलेली ही महिला काही दिवसांपूर्वीच माहेरी आली होती. मात्र आता या महिलेने आपल्या दोन वर्षांच्या मुलीसह नदीत उडी घेतली. या घटनेचे नेमके कारण काय? हे अद्याप समजू शकलेले नाही. सध्या या महिलेचा शोध घेतला जात आहे.