ठाणे – काही घटना या सुन्न करणाऱ्या असतात. अशा घटनांवर कसं व्यक्त व्हावं? किंवा संबंधित घटना कशी मांडावी? असा प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न निर्माण होण्यामागील कारणही अगदी तसंच आहे. एका सावत्र बापाने 4 वर्षाच्या चिमुकल्याचा खून केला आहे. संबंधित घटना ही ठाण्यात चितळसर मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत घोडबंदर रोड परिसरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सावत्र बाप जरी असला तरी आरोपीला मानवता हा धर्म नव्हता का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
संबंधित घटनेमुळे ठाणे शहर हादरलं आहे. घटना समजल्यानंतर अनेक जण सुन्न झाले आहेत. पोलिसांनी आरोपी सावत्र बापाला अटक केली आहे. पण या घटनेत 4 वर्षाच्या निष्पाप चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. त्याची काहीही चूक नसताना त्याच्या सावत्र पित्याने त्याची हत्या केली आहे.
घोडबंदर रोड परिसरातील दोस्ती एम्पेरियाजवळ असणाऱ्या एमएमआरडीए इमरतीमध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय दिलशान इम्रान याने रेश्मा नावाच्या महीलेबरोबर लग्न केलं होत. रेश्माचे हे दुसरे लग्न होते. तिला पहिल्या नवऱ्यापासून आर्यन नावाचा पाच वर्षांचा मुलगा होता. मुलगा असल्याचे रेश्माने दिलशान पासून लपवले होते. मात्र त्यानंतर रेश्मा आर्यनला दिलशान आणि ती राहत असलेल्या घरी घेऊन आली. मात्र या घटनेचा दिलशान याला प्रचंड राग आला. त्यामुळे तो आर्यनचा राग राग करू लागला. याच रागातून त्याने 28 जुलैला सायंकाळी साडेसात वाजण्याचा सुमारास आर्यनचा गळा पकडून त्याला लोखंडी सोफ्यावर आपटले.
यामध्ये आर्यनच्या मणक्याचे हाड तुटले आणि पोटात देखील रक्त साखळले. त्यानंतर आर्यनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आर्यनचा मृत्यू झाल्याने दिलशान याच्यावर चितळसर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मानपाडा पोलीस करत आहेत अशी माहिती परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली.