कुंभारी :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कुंभारी येथील महिला बचत गटाकडून बुधवार दि. 14 ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा मोहिम राबविण्यात आली. तसेच लोकांना प्रेरणा देण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी तिरंगा रॅली काढण्यात आली. कुंभारीच्या सरपंच श्रुती निकंबे, उपसरपंच राजशेखर कोरे, मानव संसाधन व्यक्ती तनुजा जवळे, निर्मला जवळे यांनी कुंभारी ग्रामपंचायत येथून हिरवी झेंडी दाखवली. दरम्यान घरोघरी राष्ट्रध्वज लावून मोहिमेबाबत लोकांना जागृत केले.
मानव संसाधन व्यक्ती यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाच्या सदस्यांनी सहभाग घेतला आणि घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी हर घर तिरंगा मोहिमेबद्दल लोकांना जागृत केले. प्रत्येक घरामध्ये तिरंगा असतो – प्रत्येकाच्या हृदयात तिरंगा असतो भारत माता की जय, वंदे मातरम असे म्हणत बचत गटातील महिलांनी प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहोचविला. महिला बचत गटाच्या सीआरपी निर्मला जवळे यांनी यावेळी म्हटलंय की, हर घर तिरंगा अभियानांतर्गत आजादीका अमृत महोत्सव राबविण्यात आलाय. शिवाय देशभक्तीची सामूहिक जाणीव प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे काम महिला बचत गटातील सदस्या करीत असल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद आंदोडगी, सुरज पाटील, सचिन सुतार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.