जालना (प्रतिनीधी) शहरातील मालमत्ता धारकांना वाढीव टॅक्स लागू करण्यासाठी आ.अर्जुन खोतकर हेच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे मा.आ.कैलास गोरंट्याल यांनी पत्रकारांशी बोलतांना केला आहे. जालना नगर पालिकेचे महानगर पालिकेत रूपांतर करण्यासाठी आपण सातत्याने विरोध करत आलो आहोत. महापालिका अस्तित्वात आल्यास शहरातील जनतेवर वाढीव टॅक्सचा बोजा पडणार असल्याचे आपण वारंवार सांगितले होते. मात्र, काही मंडळींनी आर्थिक बाबींचा आणि जनतेवर लादण्यात येणाऱ्या वाढीव कराचा कोणताही विचार न करता राज्यात असलेल्या सत्तेच्या माध्यमातून जालना नगर पालिकेचे महानगर पालिकेत रूपांतर करण्याचा आपला बालहट्ट पूर्ण केला असल्याची टीका गोरंटयाल यांनी केली आहे.
महत्वाची बाब म्हणजे महापालिका अस्तित्वात आल्यास आयएएस दर्जाचे अधिकारी मिळतील, विकास कामांना गती मिळेल, जनतेवर टॅक्सचा बोजा पडणार नाही अशी आश्वासन त्यावेळी आपल्या विरोधकांनी दिली होती. आज काय परिस्थिती आहे जालना महानगर पालिकेची शहरातील जनतेला कळून चुकली आहे. शहरातील विकास कामे ठप्प झाली असून राज्य शासनाकडूनही विकास कामांना अपेक्षित निधी मिळत नसल्याने आ.अर्जुन खोतकर यांच्यामुळे शहरातील व्यापारी व मालमत्ता धारकांना टार्गेट करत जालना महानगर पालिकेकडून कर वसुलीसाठी मालमत्ता जप्त करण्याच्या कारवाया केल्या जात असल्याचा आरोप माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी केला आहे. सध्या वसूल करण्यात येत असलेला टॅक्स हा अगोदर पेक्षा अधिक आहे. भविष्यातही चार पट टॅक्स वाढणार असून हा संपूर्ण दोष खोतकरांचा असल्याची टिकाही गोरंट्याल यांनी केली आहे.