भानामती, जादूटोणा करणाऱ्या एका मांत्रिकाने स्वतःच्या २२ वर्षीय मुलीची निर्घृणपणे हत्या केली. दुर्गंधी सुटू नये म्हणून मीठ लावून मृतदेह घरातील किचनमध्ये पुरून ठेवला. त्यावर शेंदूर फासलेला दगड ठेवून मांत्रिक कुटुंबासह फरार झाला. हा धक्कादायक प्रकार औरंगाबादेतील वाळूज परिसरातून उघडकीस आला आहे. या भयंकर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या खुनी मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. काकासाहेब नामदेव भुईगळ (मूळ गाव धानोरा, ता. फुलंब्री) असं आरोपी मांत्रिकाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी काकासाहेब हा पत्नी आणि दोन मुलींसह वाळूज परिसरात राहत होता.
काही महिन्यापूर्वी या मांत्रिकाने स्वतःच्या २२ वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर त्याने मुलीचा मृतदेह किचन रूम मधील सिलेंडर ठेवण्याच्या जागेवर पुरून ठेवला. मुलीची हत्या केल्यानंतर तो कुटुंबासह फरार झाला होता. बुधवारी (१४ डिसेंबर) घरमालकाने दरवाजा तोडला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
घरमालकाने या घटनेची माहिती तातडीने वाळूज पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सुमारे तीन महिन्यापूर्वी ही घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.