रत्नागिरी – शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात बेकायदेशीररित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला सापळा रचून गजाआड करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील टीआरपी या भागात असलेल्या साई हॉस्पिटलमधील डॉक्टर अनंत शिगवण याच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे.
रत्नागिरीमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा मोठ्या शिताफीने पोलिसांनी सापळा रचत हे प्रकरण उजेडात आणले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी डॉक्टर शिगवण याच्याविरोधात बेकायदेशील गर्भपातच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी खात्री करून सापळा रचला आणि डॉक्टरला रंगेहात पकडण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली असून या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणामुळे बीडमधील मुंडे दाम्पत्याच्या गर्भपाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
डॉक्टरला रंगेहात पकडण्यात पोलिसांना यश
हाती आलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे याबाबत लेखी तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी डॉक्टरला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुख्य बाब म्हणजे डॉक्टरला गर्भपात करण्यासाठी परवानगी देखील नव्हती. शिवाय, यापूर्वी देखील त्याच्यावर कारवाई केल्याची माहिती आहे. त्यानंतर देखील बेकायदेशीररित्या हे कृत्य सुरूच होते. दरम्यान, जिल्हा शल्य चिकित्सकांकडे याबाबत लेखी तक्रार झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा बडगा उगारत सापळा रचला आणि ही कारवाई केली आहे. शिगवण याच्यावर कारवाई केल्यानंतर बीडमधील मुंडे दाम्पत्याच्या गर्भपात प्रकरणाच्या आठवणीही यामुळे सर्वांच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या आहेत.