मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एका मुलीच्या जन्मानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. असं म्हणतात की नवीन बाळ आपला पायगुण घेऊन घरात येतं. नव्या बाळाच्या जन्माने घरातील कुटुंबियांचं भाग्य उजळतं असाही समज आहे. पण मध्यप्रदेशातील या नवजात बालिकेचा पायगुण सोडा पण पाय बघूनच कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. ग्वाल्हेरच्या कमलाराजा रुग्णालयात एका महिलेने चार पाय असणाऱ्या मुलीला जन्म दिला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरती कुशवाहा नावाच्या महिलेने गुरुवारी रात्री उशिरा या चार पायांच्या बाळाला जन्म दिला आहे.
कुशवाह कुटुंबातील या नव्या सदस्याला भेटण्यासाठी रुग्णालयात शेकडो लोकांनी गर्दी केली होती. सोशल मीडियावर ही बातमी पसरताच कुटुंबीयच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील लोकांनी सुद्धा रुग्णालयात धाव घेतली होती. स्वतः डॉक्टरसुद्धा या बाळाला बघून थक्क झाले आहेत. सध्या डॉक्टरांनी मुलीची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. प्राप्त माहितीनुसार शस्त्रक्रिया करून डॉक्टर या बाळाचे दोन पाय काढून टाकण्याच्या विचारात आहेत. सध्या या बाळाच्या चाचण्या केल्या जात असून ती जर पूर्णपणे निरोगी असेल तर तिचे दोन अतिरिक्त पाय शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकले जातील.
दरम्यान, काही जण या बाळाला चमत्कारिक म्हणत तर काही जण याला देवाचा अवतार सुद्धा मानत आहेत. आजवर देशात अशाप्रकारच्या चारच बाळांचा जन्म झाला होता. मध्य प्रदेशातील ही पहिलीच घटना आहे. वैद्यकीय भाषेत अशा प्रकारे जन्मलेल्या मुलांना इशिओपेगासचे प्रकरण म्हणून ओळखले जाते. लाखात असे एखादे बाळ असते ज्याचा जन्म अतिरिक्त अवयवांसह होतो.
मार्चमध्ये मध्य प्रदेशातील रतलाममध्ये एका महिलेने दोन डोकी, तीन हात आणि दोन पाय असलेल्या बाळाला जन्म दिला होता. त्यावेळी मुलावर उपचार करणारे डॉ ब्रजेश लाहोटी यांनी एएनआयला सांगितले की, “हे जोडप्याचे पहिले अपत्य आहे, यापूर्वी सोनोग्राफी अहवालात दोन मुले असल्याचे समोर आले होते. मात्र हे एकच बाळ दोन डोक्यांसह जन्माला आले आहे ही एक दुर्मिळ घटना असली तरी या बाळाचे आयुष्य फार मोठे नसेल.”