दिल्ली : बेदरकार ड्रायव्हिंगमुळे जीवघेण्या अपघातांचे सत्र वाढले आहे. राजधानी दिल्लीमध्येही अशा अपघातांची कमी नाही. दिल्लीच्या गुलाबी बाग परिसरात एका भरधाव कारने फुटपाथवरून चालणाऱ्या मुलांना चिरडले. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. भरधाव वेगातील कारखाली तीन निष्पाप मुले चिरडली.
या अपघाताने बेदरकार ड्रायव्हिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तिन्ही मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. भरधाव गाडीखाली चिरडलेल्या मुलांना वाचवण्यासाठी रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या तसेच परिसरातील नागरिकांनी प्रचंड धावाधाव केली. मुलांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. यातील दोन मुलांना किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली. मात्र एकाची प्रकृती अद्याप गंभीर आहे.
तातडीच्या उपचारामुळे तिने मुलांच्या जीवावरील धोका टळला. सध्या गंभीर अवस्थेत असलेल्या मुलाच्या प्रकृतीतही अधिक उपचारांती सुधारणा होईल, असा विश्वास रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, अपघात झालेल्या परिसरात शाळकरी मुलांची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांना वेगाची मर्यादा आखून देण्यात यावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. दरम्यान, अपघाताला कारणीभूत ठरलेल्या चालकाला अटक करण्यात आली असून अधिक पोलीस तपास सुरू आहे.