आजपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. आज पहिल्याच दिवशी सीमावादाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक-आमने सामने आल्याचे बघायला मिळाले. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना उत्तर दिलं.
अजित पवारांकडून सीमावादाचा मुद्दा उपस्थित अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बोलता अजित पवारांकडून सीमावादाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. “बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही सुरू आहे. अशावेळी महाराष्ट्र त्यांच्या पाठिशी उभा आहे. या विषयी अमित शहा यांच्याशी बैठक झाली असताना आणि बेळगावात कोणालाही अडवणार नाही, असे ठरलं असताना जिल्हाधिकारी त्यांच्या बंदी कशी आणू शकतात? गृहमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मात्र, गृहमंत्र्यासमोर ठरलेलं कोण मोडत आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं पाहिजे. त्याच्या पुढची काय कारवाई केली जाणार, हे सुद्धा समजलं पाहिजे,” असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, अजित पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. “विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जो मुद्दा मांडला आहे, तो महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. या मुद्द्यावर पहिल्यांदाच देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी केली आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये हे पहिल्यांदाच घडले आहे. या बैठकीत आम्ही सीमावादाच्या मुद्द्यावर ठोस भूमिका घेतली होती. महाराष्ट्रातील वाहनांवर होणारे हल्ले खपवून घेणार नाही, हे आम्ही स्पष्टपणे सांगितले होते. अमित शहा यांनी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनाही समज दिली होती. अमित शहा यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारची भूमिका मांडली होती”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
“सीमावादाच्या मुद्द्यावरून राजकारण करू नये. राजकारण करण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. आधीच्या सरकारने बेळगावातील गावासांठी असलेल्या योजना बंद केल्या होत्या. आम्ही त्या योजना पुन्हा सुरू केल्या. कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही आम्ही सीमावासियांसाठी दोन हजार कोटींची योजना सुरू केली. मुळात सीमावासीयांच्या पाठिशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे”, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटवरही प्रतिक्रिया दिली. “ अमित शहांबरोबर झालेल्या बैठकीदरम्यान आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही केलेले ट्वीट चुकीचं असल्याचे सांगितले आहे. त्यावर त्यांनी हे आमचं ट्वीट नाही सांगत नकार दिला. हे ट्वीट ज्यांनी केलं आहे त्यांचीही माहिती त्यांना मिळाली आहे. या ट्वीटमागे कोणता पक्ष आहे, याचीही माहिती मिळेल,” असंही एकनाथ शिंदें म्हणाले.