कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख असलेल्या जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी जालना येथील पदभार घेतल्या नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचार्यांना शिस्तीचे धडे देत प्रशासनाचा कारभार लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न चालवला आहे. जिल्हा परिषद तक्रार दिन साजरा करुन जनतेला न्याय देण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांनी सुरु केले आहे. त्यामुळे कामचुकार अधिकारी आणि कर्मचारी यांनी चांगलाच सधका घेतलाय.
जिल्हा परिषद अंतर्गत विभागांशी संबंधित जनतेच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी व त्या समस्यांचे निवारण जलद गतीने व विहीत वेळेत होण्यासाठी जिल्हा परिषद तक्रार दिन आयोजीत करण्यात आला असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांनी म्हटले आहे.
जिल्हा परिषद तक्रार दिन दर महिण्याच्या पहिल्या सोमवारी दुपारी 12 ते 2 या कालावधीत जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजीत करण्यात आला आहे. त्या रोजी सुटी असल्यास तक्रार दिन हा पूढील कामकाजाच्या दिवशी घेण्यात येणार आहे.
सदर तक्रार निवारण दिनास अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व सर्व कार्यालय प्रमुख अंतर्गत जिल्हा परिषद जालना, सर्व गट विकास अधिकारी यांनी उपस्थित राहणे बंधनकारक राहील. उपस्थित राहणे शक्य नसल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे. व सदर तक्रार दिनासाठी प्रतिनिधी पाठवावा लागणार आहे.
या तक्रार निवारण दिनामध्ये प्राप्त होणार्या तक्रारीचे सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक विभागाने त्यांचे कार्यालयात नोडल अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करावी. इतर तक्रारी सोबत आस्थापना विषयक तक्रारी सुध्दा स्विकारण्यात येतील. या तक्रारींचा दरमहा आढावा घेण्यात येईल. सदर तक्रारींचे निवारण एक महिण्यात करावयाचे आहे. विहित कालावधीत निवारण झाले नसेल तर त्याबाबत विभाग जबाबदार असेल. ज्या प्रकरणात उपलब्ध नियम, शासन निर्णय परिपत्रक इ. मधील तरतूदीनुसार तक्रारीचे विहीत कालावधीत निवारण होणे शक्य नसल्यास व या निवारणास काही अतिरीक्त कालावधी लागू शकेल अशी परिस्थिती असल्यास त्याबाबत योग्य ती कारणमिमांसा नमूद करुन तक्रारदारास अवगत करावे लागणार आहे.
यासाठी सामान्य प्रशासन विभागाने प्राप्त तक्रारींची नोंदणी करण्याची व्यवस्था करावी. सामान्य प्रशासन विभागाने यासाठी गुगल शीट शेअर करुन वेळोवेळी तक्रारींची सदयस्थिती सर्व खाते प्रमुखांनी भरावी. अशा सुचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांनी दिल्या आहेत. यामध्ये नोडल/समन्वयक अधिकारी म्हणुन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) यांची नियुक्ती करण्यात येत आली आहे. त्यांनी सदर तक्रार दिनाचे इतिवृत तयार करावे. व प्रभावी अंमलबजावणी करावी. जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील नागरिकांनी ग्रामीण भागातील विकासाशी निगडीत समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित तक्रार निवारण दिनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांनी केले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची प्रलंबीत कामे मार्गी लागणार आहेत.