महिला या काहीच करु शकत नाहीत, त्यांच्या भरोशावर सोडून कसे चालेल… असे शब्द सहजच एखादी जबाबदारी वाटप करतांना ऐकायला मिळतो. खरं तर महिलेच्या भरोश्यावर कोणतीच कामे होऊ शकत नाहीत असा भ्रम अनेक पुरुष मंडळीच्या मनात असतो. त्यामुळे ते महिलेला साधा व्यवहार देखील करु देत नाहीत. परंतु, असे लोक म्हणजे मुर्खांचीच भरती आहेत. कारण, आजची कोणतीच स्त्रि कमकुवत नाही. तीला कायद्याने दिलेल्या अधिकारामुळे मान सन्मान तर मिळतोच आहे. शिवाय वर्षानुवर्ष तिच्या अधिकाराचे हरण करणार्याच्या मानगुटीवर बसून ती आता गाव, राज्य, देश आणि सर्वच जबाबदार्या चांगल्या सांभाळू शकतात. आणि हो… पुन्हा उपकाराची भाषा वापरु नका, आम्ही दिले म्हणून अधिकार गाजवते आहे. असे अजिबात नाही. सत्ता भोगणे आणि राज्य करणे ही काही पुरुष जातीच्या बापाची पेंढ नाही, म्हणून तुम्ही दिले म्हणून स्त्रिया सत्ता भोगत आहेत किंवा अधिकार गाजवत आहेत. खरं तर स्त्रियांनी गेली वर्षानुवर्ष स्वतःच्या आशा अपेक्षा दाबून मोठे मन करुन तुम्हाला सत्ता उपभोगायला दिली. तीला आता अबला किंवा तुमच्यामुळे तीला संधी मिळालीय असे म्हणू नका, उगाच स्वतःचा मोठेपणा गाजवून तीच्यावर उपकार केल्याचा आव आणू नका. आरे उलट तुम्ही कीती लाचार आहात हे स्वतःच्या मनाला विचारा.
तुम्हाला सत्तेवर आणण्यासाठी ती मोठ्या मनाने तिच्या अधिकाराचा वापर तुम्हाला करायला देते, तीच्या हक्काच्या खुर्चीवर तुम्हाला बसायला देते, तीच्या हक्काची जागा तुम्ही आजही सोडायला तयार नाहीत. तरीही ती काहीच बोलत नाही. एवढे मोठ्ठे मन तुमचे कधी आहे का? आणि होणार का? तुम्हाला एकदा खुर्ची मिळाली की, वर्षानुवर्ष त्या खुर्चीला चिकटून बसता. तिच्या बर्थडे ला किंवा एखाद्या दिवसी सरप्राईज म्हणून तिला कधी तुमच्या अधिकाराच्या खुर्चीवर आणून बसवलंय का? विचारा तुमच्या मनाला… नाही ना? मग तुम्हीच ठरवा दिलदार आणि मोठ्या मनाचं कोण आहे ते? आणि हो पुन्हा एक गोष्ट अभ्यासायचा सल्ला द्यावा वाटतो, जरा कलेक्टर, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मोठ्या पदावर काम करणार्या महिलांकडे बघा. त्या कशा पध्दतीने आपापली जबाबदारी सांभाळत आहेत. सध्या तरी याच पदावर काम करणार्या महिलांचा अभ्यास करा. कारण, तुमच्या विचार क्षमतेच्या दृष्टीकोणातून एवढे जरी अभ्यासले तरी बस होईल. कारण, गाव आणि जिल्ह्याच्या बाहेर न डोकवणार्या खुळचट विचारसरणीच्या लोकांना राष्ट्रपती सारख्या पदावर देश सांभाळणार्या महिलांचा अभ्यास तुमची हिंम्मतच होणार नाही. कारण, जिल्हा पातळीवरचाच महिलांना सन्मान न देणारे आणि महिलांना कमजोर समजणारे एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत महिलांचा आणि त्यांच्या कर्तबगारीचा काय अभ्यास करणार? म्हणून गरज आहे आत देश बदलन्याची, देशातल्या प्रत्येकाची मानसीकता बदलन्याची. देश बदलायचा असेल तर आधी स्वतःची मानसीकता बदला. स्वतःच्या घरातल्या स्त्रिला सन्मान द्या, मग ती आई असो, पत्नी असो की, मुलगी असो, तिला आणि तिच्या सन्मानाला कधीही ठेच पोहचू देऊ नका, तीच्यावर उपकार करतोय, तीला संधी देताय असा फाजील अविभाव मनातून काढून टाका, ती तुमच्या सोबज जगू शकते तर तुमच्या शिवाय देखील जगू शकते. आठवत नसेल तर जेष्ट समाजसेवीका सिंधुताई सपकाळ यांचा थोडा तरी इतिहास अभ्यासा. पुरुष प्रधान संस्कृतीचे जनत करु पाहणार्यांना स्त्रिच्या कर्तबगारीची जाणीव होईल. म्हणून सांगावेसे वाटते….
आता तरी दृष्टीकोण बदला रे…
त्याशिवाय देश बदलणार नाही…
– सौ. करुणा अच्युत मोरे