जालना (प्रतिनिधी) – जालना तालुक्यातील 29 ग्रामपंचायती पैकी 11 ग्रामपंचायतीवर आ. कैलास गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने वर्चस्व सिध्द केले आहे. या निवडणुकीत नेर, रामनगर या तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे.
जालना तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज मंगळवार रोजी जालना तहसील कार्यालयात घोषीत करण्यात आला आहे. या निवडणुकीत आ. कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत 11 ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व सिध्द केले आहे. या 11 ग्रामपंचायतीपैकी रामनगर, नेर, पोखरी, धावेडी, साळेगाव/नेर, पिर पिंपळगाव, नंदापूर, मजरेवाडी, राममुर्ती या ग्रामपंचायती काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आले असून महाविकास आघाडीने सावरगाव, मानेगाव खा. पाहेगाव या ग्रामपंचायतीवर विजयाचा झेंडा रोवला आहे. जालना तालुक्यातून विजयी झालेले सरंपच पुढील प्रमाणे आहेत. रामनगर सरपंच – ॲड. गोपाल मोरे (काँग्रेस), नेर सरपंच – तेजस कुलवंत (काँग्रेस), पोखरी सरपंच – अरूण घडलिंग (काँग्रेस), धावेडी सरपंच मल्हारी पठाडे (काँग्रेस), साळेगाव/नेर सरपंच – ज्ञानेश्वर माऊली डुकरे (काँग्रेस), पिर पिंपळगाव सरपंच – राजु बावने (काँग्रेस), नंदापुर सरपंच – दत्तु कुरधने (काँग्रेस), मजरेवाडी सरपंच – मलिका जाकीर तुंडीवाले (काँग्रेस), राममुर्ती सरपंच – अय्युब परसुवाले (काँग्रेस), सावरगाव सरपंच – श्रीमती इंदुबाई राऊत (म.वि.आ.), मानेगाव खा. सरपंच – जिजाबाई राठोड (म.वि.आ.), पाहेगाव सरपंच – श्रीमती ऊषा चव्हाण (म.वि.आ.) निवडून आले असून सदस्य पदाच्या निवडणुकीत देखील सर्वाधिक जागेवर विजय मिळविला आहे. या निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंचासह सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे आ. कैलास गोरंटयाल, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राम सावंत, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, अंजेभाऊ चव्हाण, नारायण वाढेकर, दत्ता पाटील शिंदे, दत्ता घुले, शेख शाहेद यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.
मतदारांनी विकास कामांची पावती दिली – आ. गोरंट्याल
जालना विधानसभा मतदार संघात आपल्या कार्यकाळात विकासाची अनेक कामे मार्गी लागली आहेत. या विकास कामांची जाण ठेवून ग्रामिण मतदारांनी केलेल्या कामाची पावती दिली अशी प्रतिक्रिया आ. कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केली आहे. जालना विधानसभा मतदार संघातील बहुतांशी गावांमध्ये आपण विकास कामांवर भर दिला असून गावातील विकास कामांचे प्राधान्यक्रम ठरवून पिण्याचे पाणी, रस्ते, सामाजिक सभागृह आदी मुलभूत गरजा विकास कामांच्या माध्यमातून पुर्ण केल्या असून अनेक गावातील विकास कामे प्रगतीपथावर आहे. या विकास कामांची दखल घेत ग्रामिण भागातील मतदारांनी नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देत सरपंच पदासह सदस्य पदाच्या निवडणुकीत विरोधकांना त्यांची जागा दाखवली असल्याचे आ. गोरंट्याल यांनी म्हटले आहे.