जालना :- वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य या संदर्भातील जिल्हा कृती आराखडा आखणे तसेच या आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीची बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, डॉ. गजानन म्हस्के, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिपक काजळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे आदींसह अन्न व सुरक्षा विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व जिल्हा प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने फेब्रुवारी 2019 मध्ये हवामान बदल आणि मानवी आरोग्यावरील राष्ट्रीय कार्यक्रम सुरु केला आहे. हवामान बदलावरील युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्वहेन्शन 21 मार्च 1994 रोजी हरितगृह वायुचे प्रमाण स्थिर करण्यासाठी अस्तित्वात आले. ज्यामुळे हवामान प्रणालीमध्ये धोकादायक मानववंशीय हस्तक्षेप टाळता येईल. भारताने युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्वहेन्शनद्वारे विहीत दायित्वाच्या अनुषंगाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. भारतातील सर्व नागरिकांसाठी विशेषत: असुरक्षित गट यामध्ये मुले, स्त्रिया आणि दुर्लक्षित लोकसंख्येसाठी हवामान संवेदनशील आजारांविरुध्द आरोग्य सेवा मजबुत करणे तसेच हवामानातील परिवर्तनशीलता आणि तीव्र हवामानामुळे विकृती, मृत्यू, जखम आणि आरोग्याची असुरक्षा कमी करणे असा दृष्टीकोन ठेवण्यात आला आहे. वातावरणातील बदल व मानवी आरोग्य संदर्भात राज्यस्तरावर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम, होणारे आजार ओळखणे, अशा आजारांचे सर्वेक्षण करुन जोखीम निश्चित करणे. जोखीमग्रस्त भाव व लोकसंख्या निश्चित करुन त्यानुसार कार्य योजना आखणे. उपलब्ध संसधानाची यादी करणे. संबंधित जबाबदार व्यक्ती / संस्था यांची यादी करुन त्यांची भूमिका व जबाबदारी निश्चित करणे. विविध विभाग, नागरिक संस्था यामध्ये समन्वय स्थापन करणे, असे उद्देश या टास्क फोर्सचे आहेत. जिल्हा स्तरावरील फोर्सचे उद्देश वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य या संदर्भातील जिल्हा कृती योजना आखणे व या कृती योजनेची अंमलबजावणी करणे, असे आहेत, अशी माहिती सादरीकरणाव्दारे बैठकीत देण्यात आली.