सांगली : आटपाडी पोलीसांनी एक गुन्हा दाखल केल्यानं संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एका रुग्णालयात रुग्णावर उपचार केल्याप्रकरणी भोंदुगिरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्याबाबतचा थेट सिटिटीव्ही व्हिडिओच समोर आल्यानं तंत्रमंत्र करणाऱ्याचा पर्दाफाश झाला आहे.
राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत कायदा असतांना असे प्रकार सर्रास घडत असल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे रुग्णालयातच हा प्रकार झाल्यानं याबाबत अधिकच चर्चा होऊ लागली आहे. आटपाडी पोलिस ठाण्यात याबाबत संजय दादा गेळे आणि अश्विनी संजय गेळे यांच्या विरुद्ध जादुटोणा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये खाजगी रुग्णालयात उपचार करत असणाऱ्या एका रुग्णावर तंत्रमंत्र करून जादूटोणा केल्याच्या तक्रारीवरून आटपाडी पोलीसांनी ही कारवाई केली आहे.
सांगली येथील आटपाडी पोलिसांत एका दाम्पत्यावर जादूटोण्याचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली असून व्हिडिओ आणि ध्वनीचित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ही कारवाई करण्यात आली होती.
सांगली परिसरात या जादूटोण्याची जोरदार चर्चा होती, याप्रकरणी सीसीटीव्ही समोर आला आहे त्यामध्ये हा संपूर्ण प्रकार कैद झाल्याने पोलिसांना सबल पुरावा मिळाला आहे.
जादूटोणा करणारा व्यक्ती मंत्रतंत्र करत रुग्णाच्या डोक्यावर हात ठेऊन जादूटोणा करत असल्याचे दिसून येत आहे, यामध्ये डॉक्टरांनी विरोध केल्याचेही यामध्ये दिसून येत आहे.
सामाजिक कार्यकर्ते संपतराव धनवडे यांनी याबाबत पोलिस ठाण्यात निवेदन देत कारवाईची मागणी केली होती, त्यावर पोलीसांनी ही कारवाई केली आहे.
महाराष्ट्र राज्यात कायदा केला आहे, जनजागृतीही केली जात आहे. तरी देखील अशा घटना वारंवार घडत आहे, त्यातच थेट रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.