जालना : बदनापूर तालुक्यातील भोर्डी नदीच्या पुर्नजीवन व सुशोभीकरणाबाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी शिवसेना उपनेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या सहकार्याने केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरण सचिवांना आदेश दिले असून सचिवांनी जिल्हा परिषद सी. ई.ओ. ना परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
बदनापूर तालुक्याची जलवाहिनी असलेली भोर्डी नदी आन्वी लगत कळमेश्वर खोऱ्यात उगम पावली. आन्वी -उज्जैनपुरी- हिवरा राळा- भराडखेडा- केळीगव्हाण – राजेवाडी- मात्रेवाडी- पिरसावंगी मार्गे वाहत जात भोर्डी नदी पुढे अंबडगांव शिवारात दुधना नदीस मिळते. तीन दशकांपूर्वी बारमाही वाहणारी नदी आज केवळ पावसाळ्यातच वाहते. नदीवर आन्वी येथे धरण तर राजेवाडी येथील साठवण तलावामुळे नदीच्या दोन्ही तीरावरील झाडे नष्ट झाली असून नदीच्या तीरावर शनिदेवाचे तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ आहे.
पर्यावरण व पर्यटन विभागाकडून नदीचे पुर्नजीवन व सुशोभीकरण करावे असे भाऊसाहेब घुगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वेळोवेळी निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्र्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देत पर्यावरण विभागाच्या सचिवांना तर सचिवांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना डीपीआर सह परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना यांची भेट घेऊन तातडीने प्रस्ताव सादर करावा अशी मागणी भाऊसाहेब घुगे यांनी केली. या वेळी बुटेगाव चे सरपंच हरीभाऊ कापसे, काजळ्याचे सरपंच रंगनाथ देवकाते ,जवसगाव चे उपसरपंच रामकिसन गारखेडे, मांजरगावचे सरपंच गायकवाड, निवृत्ती डाके, कैलास दुधानी आदींची उपस्थिती होती.