जालना: शिक्षण बचाव समन्वय समितीची विस्तारित बैठक सिटू भवन संजय नगर जालना येथे (दि.२४) रोजी संपन्न झाली.यावेळी कॉम्रेड अण्णा सावंत लिखित पुस्तिकेचे प्राध्यापक जुन्ने यांच्या हस्ते प्रकाशन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा शिक्षक संघाचे नेते डी एस वरवटे हजर होते .
सुरुवातीला प्राध्यापक संघटनेचे डॉ. मारोती तेगमपुरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना जुन्ने सर म्हणाले की, राष्ट्रीय शिक्षण धोरण – 2020 भांडवलदार हिताय मनुवाद सुखाय ही पुस्तिका अतिशय मार्मिक आणि सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिली आहे. या पुस्तिकेत शिक्षणाचे महत्त्व विशद करत असतानाच राष्ट्रीय शिक्षण धोरण हे कसं बहुजनवर्गाच्या विरोधातले आहे. समाजाला पुन्हा गतकाळाकडे कसे घेऊन जाणार आहे हे स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे गोरगरीब विद्यार्थ्यावर काय परिणाम होतील आणि येथील दलित आदिवासी गरीब विद्यार्थी शिक्षणाच्या बाहेर कसा फेकला जाईल हेच नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण असून मनुवादी व्यवस्था बळकट करणारे आहे. विशेष म्हणजे अण्णा सावंत यांनी मार्क्सवादी दृष्टिकोनातून ही पुस्तिका लिहिली आहे.शैक्षणिक सिद्धांताची मांडणी यामध्ये केली आहे. शिक्षणाचा इतिहास, शिक्षण सिद्धांत, शिक्षण व्यवस्था व सध्याची परिस्थिती यावर उत्तम भाष्य केले आहे. या धोरणाची चिकित्सक चिरफाड करून पर्यायी शिक्षण धोरण कसे असावे हे पण सुचवले आहे . लढ्याचा कृती कार्यक्रम यामध्ये असल्यामुळे ही पुस्तिका वाचनीय तर आहेच,पण त्याचबरोबर शिक्षण बचाव लढायचे हत्यार बनणार आहे. प्रेमदास राठोड सरांनी देखील या पुस्तिकेवर प्रकाश टाकताना या पुस्तिकेचा नवीन शिक्षण धोरण समजून घेण्यासाठी आणि पुढील लढाई तीव्र करण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो असे बोलताना महत्व पटवून दिले.
यावेळी शिक्षण बचाव समन्वय समितीचे निमंत्रक अनिल मिसाळ, वसंत घुले, नारायण मुंढे ,गौरव चव्हाण ,खारतोडे सर, आर. एफ. आढे सर,गंगाधर जोशी सर यांच्यासह अनेकांनी उपस्थिती होती.