अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषदेच्या उपक्रमशील शिक्षिका तथा सामाजिक कार्यकर्त्या अनिता लक्ष्मण काळे यांना लेक लाडकी अभियान मंचच्या वतीने भारत गौरव राष्ट्रीय चेतना पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला. मुंबई महापालिकेच्या महापौर श्रध्दा जाधव यांच्या हस्ते काळे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त मुंबई पत्रकार भवन येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगच्या सदस्या अॅड. आशाताई लांडगे, नायर हॉस्पिटलच्या डीन डॉ. सारिका पाटील, सिध्दीविनायक ट्रस्टच्या स्मिता बोंदरेकर, मॉडेल स्नेहल भोपळे, कार्यक्रमाचे संयोजक सूरज भोईर, लेक लाडकी अभियान मंचच्या समन्वयक अश्विनी निवाते आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अनिता काळे या भिस्तबाग येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, त्या सामाजिक क्षेत्रात मागील दोन दशकापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. सावित्रीबाई फुलेंचा वारसा पुढे चालवून त्या सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना विद्या दानाचे पवित्र कार्य करत आहे. तसेच जिल्हा परिषदेतील शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी त्यांनी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण देण्याची मोहिम देखील सुरु केली आहे. महिला सक्षमीकरण व गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी त्यांचे सातत्याने सुरु असलेल्या विविध उपक्रम व विविध सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मराठा समन्वय परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलेश पाटील, मोरे सर, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, शिक्षण अधिकारी भास्कर पाटील, गटशिक्षणाधिकारी बाबूराव जाधव, विस्तार अधिकारी रामनाथ कराड, केंद्र प्रमुख उदयकुमार सोनोळे, मिनाक्षी जाधव, मराठा समन्वय परिषद, मराठा सेवा संघ, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, शिक्षिका, जिजाऊ ब्रिगेड, प्रयास ग्रुप, दादी-नानी ग्रुपचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.