जालना :- भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे जिल्हयातज काटेकोर पालन होईल, या दृष्टीने नियोजन करावे तसेच निवडणूक विषयक कामे वेळेत व जबाबदारीने पार पाडावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज निवडणूक कामाकाजासाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस उपजिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, अंजली कानडे, आदींसह नोडल अधिकारी उपस्थित होते.
विधान परिषदेसाठी पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीची केंद्रीय निवडणूक आयोगाने दि. 29 डिसेंबर रोजी घोषणा केली. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा यात समावेश असून दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदान तर मतमोजणी 2 फेब्रुवारी 2023 रोजी होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. निवडणुकीची अधिसूचना जारी करण्याची तारीख दि. 5 जानेवारी 2023, नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची अंतिम तारीख दि. 12 जानेवारी 2023, नामनिर्देशन पत्राची छाननी दि. 13 जानेवारी 2023, नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची तारीख दि. 16 जानेवारी 2023, मतदान दि. 30 जानेवारी 2023 रोजी मतदानाची वेळ सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत राहील. दि. 2 फेब्रुवारी 2023 रोजी मतमोजणी होईल.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले की, जालना जिल्हयात एकूण 15 मतदान केंद्र आहेत. निवडणूक प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी कक्षनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कामे करावीत. कुठेही आचारसंहिता भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. निवडणूक विषयक सर्व कामे वेळेत पार पाडावीत. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
निवडणूक कामे सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक समन्वय कक्ष, आचारसंहिता जिल्हा नियंत्रण कक्ष, प्रशिक्षण कक्ष, वाहन परवाना व विविध परवाने वितरण कक्ष, वाहतूक व्यवस्था कक्ष, विविध मतदान साहित्य व्यवस्थापन कक्ष, तांत्रिक सहायक, अवैध दारु वाटपास प्रतिबंध कक्ष, मतदार मदत कक्ष, जिल्हा माध्यम नियंत्रण कक्ष, स्वीप कक्ष, आरोग्य कक्ष, मुलभूत सोईसुविधा कक्ष आदी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.