जालना (प्रतिनिधी) : पत्रकारांनी एखादी राजकीय बातमी केली तर मालक त्या पत्रकारास केव्हा कामावरून कमी करेल हे सांगता येत नाही, तसेच काम करत असतांना पत्रकारांवर अनेकांचा दबाव असतो. मालकांच्या धोरणामुळे बहुतांश पत्रकार दबावात पत्रकारीता करत असल्याचे प्रतिपादन माजी कुलगुरू सुधीर गव्हाणे यांनी गुरूवार (ता. पाच) दर्पन दिनानिमित्त आयोजित पत्रकारांच्या सन्मान सोहळा व मुलाखत सत्र कार्यक्रमात व्यक्त केले.
यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार अर्जुन खोतकर, सकाळ समुहाचे मुख्य संपादक राहुल गडपाले, विनोद राऊत, समृद्धी शुगरचे संचालक सतीश घाडगे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख पंडित भुतेकर, जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, जेष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी कुलगुरू श्री. गव्हाणे म्हणाले, की कोणावर ही अन्याय झाला की त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम पत्रकारांकडून केले जाते. मात्र, आता मालकांकडून पत्रकारांवर अन्याय होत आहे. माध्यमाचे मालक वर्ग हा उद्योजक होत आहेत. त्यामुळे मालक बदला की त्यांच्या धोरणानुसार काम करावे लागते. त्यामुळे अनेक पत्रकारांनी स्वःहून राजीमाने दिले आहेत. त्यामुळे चौथ्या स्तंभातील पत्रकारीता टीकवण्याचे आवाहन आहे, असे मत श्री. गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केले.
दरम्यान, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. उपस्थित सर्व मान्यवरांचा प्रसंगी सत्कार करण्यात आला.
यावेळी सकाळचे मुख्य संपादक श्री. गडपाले म्हणाले, की आज एका दैनिक प्रकाशन करण्याची किंमत 15 रूपयांपर्यंत येते. परंतु, तेच दैनिक 5 रुपयांमध्ये वाचकांना मिळते. हा दैनिकांचा मोठा आर्थिक तोटा आहे. त्यामुळे वाचकांनी दैनिक घेताना काही भेटवस्तू किंवा वर्षभर सवलतीवर दैनिक खरेदी न करता पेपर वाचनातून उपयुक्त माहिती मिळेल, याचा विचार करून दैनिक खरेदी करून ते वाचले केले पाहिजे असे मत श्री. गडपाले यांनी व्यक्त केले. दरम्यान सकाळ समुहाचे मुख्य संपादक राहुल गडपाले यांची आमदार कैलास गोरंट्याल यांनी मुलाखत घेतली. विनोद राऊत यांची मुलाखत माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जेष्ठ पत्रकार अंकुशराव राऊत यांची भाजप जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत जुगलबंदी पहायला मिळाली. राजकारण्यांचे प्रश्न आणि त्या प्रश्नांना पत्रकारांनी दिलेली समर्पक उत्तरे यामुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. ही मुलाखत आणि हा कार्यक्रम जालना जिल्ह्याच्या ईतिहासात पत्रकारांकडून आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमांपैकी ना भुतो ना भविष्यति कार्यक्रम झाल्याची चर्चा उपस्थित पत्रकार बांधवांमध्ये सुरू होती.
प्रसंगी जालना जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ संपादक व सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार दीपक शेळके, लक्ष्मण सोळुंके, मनोज कोलते, दर्पण जैन, गणेश काबरा, नितेश महाजन, श्रीकिशन झंवर, शेख चाँद पि. जे., शहानवाज कुरैशी, बाबुजी तीवारी, प्रा. दत्ता देशमुख, नरेंद्र जोगड, सुरेश काळे, दिनेश नंद, सय्यद करीम, बाबासाहेब कोलते, मजहर सौदागर, अमेर खान, सौ. करूणा मोरे यांनी केले होते.