मुंबई: मुंबईत साखळी बॉम्ब स्फोट होतील अशी धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आल्याने खळबळ उडाली आहे. 1993 प्रमाणे साखळी बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली. फोन करणार्याने मुंबईत दोन महिन्यांनंतर माहिम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा याठिकाणी बॉम्बस्फोट होणार असल्याचं सांगितलं होतं. दहशतवाद विरोधी पथक (एटीएस)ने तात्काळ कारवाई करत धमकी देणार्याला मालाड येथून अटक केली आहे. नबी याहया खान उर्फ के.जी.एन. लाला, वय 55 असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मालाडच्या पठाणवाडीचा राहणारा आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फोन आला. 1993 जसा बॉम्बस्फोट झाला त्याप्रमाणे दोन महिन्यानंतर मुंबईमध्ये माहिम, भेंडीबाजार, नागपाडा, मदनपुरा याठिकाणी होणार आहे. तसेच मुंबई मध्ये 1993 सालासारख्या दंगली होणार आहेत. यासाठी बाहेरच्या राज्यातून लोकांना बॉम्ब ब्लास्ट आणि दंगली करण्यासाठी बोलविले आहे, असे सांगण्यात आलं. इतकंच नाही तर हा बॉम्बस्फोट घडवण्यामागे एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचंही या फोनवर सांगण्यात आलं होतं.
तसेच, काही वर्षांपूर्वी संपूर्ण देशाला हादरवून सोडणारं निर्भया प्रकरण घडलं होतं. अशीच घटना पुन्हा घडणार असल्याचंही या फोनवर सांगण्यात आलं होतं. त्यामुळे संपूर्ण पोलीस विभागात खळबळ माजली होती. याबाबत मुंबई पोलिसांनी एटीएसला माहिती दिल्यानंतर दोन पथके तयार करण्यात आली. त्यानंतर जूहू युनिटच्या पथकाने नबी याहया खान उर्फ के.जी.एन. लाला यास मालाड रेल्वे स्थानक परिसरातून शोधून काढले.
लाला याच्या विरूध्द मुंबई मध्ये जबरी चोरी, विनयभंग व अतिक्रमण असे 12 गुन्हे दाखल असून सन 2021 मध्ये त्याला मालाड पोलीस ठाणे मार्फत तडीपार करण्यात आले होते. एटीएसच्या पथकाने त्याला आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याने हा फोन कशासाठी केला याबाबत चौकशी सुरू आहे.