सातारा हिरकणी (विदया निकाळजे) : सातारा येथे महा एनजीओ फेडेरेशनचे संस्थापक शेखरजी मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली “सामाजिक संस्थांचे संघटन व सक्षमीकरण कार्यशाळा” आज स्व. पुंडलिकमहाराज वेळूकर स्मृती सभागृह येथे शनिवारी संपन्न झाली. या कार्यशाळेत सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील ५० सामाजिक संस्थांचा सहभाग होता. या कार्यशाळेत संचालक समितीच्या सदस्यांनी उपस्थित समाजसेवी संस्थाना मार्गदर्शन केले.
महा एनजीओ फेडरेशनचे कार्यकारी संचालक अक्षयमहाराज भोसले यांनी ‘सामाजिक संस्था व सोशल मीडिया’ या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले कि, “आजच्या युगात माणसाची गरज फक्त रोटी-कपडा एवढीच मर्यादित राहिली नाही, तर त्यात एक अत्यावश्यक गोष्ट म्हणजे सोशल मीडियाचाही शिरकाव झाला आहे. आजच्या काळात असा एकही माणूस नसेल जो सोशल मीडियाशी जोडलेला नसेल. प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियाच्या कोणत्या ना कोणत्या प्लॅटफॉर्मशी जोडलेली असते. आता फेसबुक असो वा ट्विटर किंवा यूट्यूब किंवा इन्स्टाग्राम या व्यासपीठांवर प्रत्येकाने आपली उपस्थिती चिन्हांकित केली आहे. सोशल मीडिया टूल हे आजच्या काळात खूप पसंतीचे साधन बनले आहे, जे खूप यूजर फ्रेंडली देखील आहे. यासाठी आजच्या युगात सामाजिक संस्थांनी सोशल मिडीयाच्या प्रभावीपणे वापर करायला शिकण्याची आवश्यकता आहे. महा एनजीओ फेडेरेशन लवकरच सामाजिक संस्थाना सोशल मिडिया या विषयावर तांत्रिक मदत पुरविणार आहे.”
महा एनजीओ फेडेरेशनची भूमिका संचालक मुकुंद शिंदे यांनी व्यक्त करताना सांगितले कि, महा एनजीओ फेडरेशन विविध सामाजिक कल्याण, समुदाय विकास आणि सेवाभावी उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांच्या सबलीकरणासाठी कार्य करत आहे. आपल्याला सामाजिक क्षेत्रातील विषयांवर मार्गदर्शन व मदत करण्यासाठी महा एनजीओ फेडेरेशन कार्यरत आहे.
महा एनजीओचे संचालक अमोल उंबरजे यांनी ‘सीएसआर भूमिका व प्रकल्प लेखन’ या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले कि, “खाजगी देणगीदार, सीएसआर कॉर्पोरेट देणगीदार, सरकारी एजन्सी आणि एनजीओ यांच्यात संवाद साधण्यासाठी आणि विविध सामाजिक उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी महा एनजीओ सदैव आपल्या मदतीसाठी कार्यरत आहे. एनजीओ कायदेशीर अनुपालन, उत्तरदायित्व, सरकारी योजना, बँक योजना, न्याय व्यवस्था, एनजीओ प्रशासन आणि खाजगी आणि संस्थात्मक देणगीदारांबद्दल जागरूकता करत असते.”
वैभव मोगरेकर यांनी ‘सामाजिक संस्था सक्षमीकरण’ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले कि, महा एनजीओ फेडेरेशन सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा समूह असून २५ पेक्षा जास्त वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर काम आपल्याच माध्यमातून करत आहे. आज महा एनजीओने संपूर्ण राज्यातील २५०० संस्थाच्या सक्षमीकरणाचा ध्यास धरला आहे.
या कार्यशाळेच्या आयोजनासाठी प्रमोद सावंत, दिपाली देशमुख, मनोज विधाते, आनंद थोरात महा एनजीओ फेडेरेशनचे कार्यालय प्रतिनिधी अपूर्वा व रेवननाथ यांनी मेहनत घेतली.