जालना रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली. पुणे-नांदेड एक्सप्रेस रेल्वे ही जालना स्थानकावरुन नांदेडसाठी सुटल्यानंतर चालत्या रेल्वेत बसण्याचा प्रयत्न करणार्या एका प्रवाशाचा तोल गेला. त्यामुळे तो रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला. चालत्या रेल्वेखाली प्रवासी जात असल्याचे दिसताच क्षणी आरपीएफचे जवान आसाराम झुंजरे यांनी जिवाची पर्वा न करता प्रवाशाकडे धाव घेत प्रवाशाला वाचविले.
पुणे-नांदेड एक्सप्रेस रेल्वे ही दि. 27 जानेवारी 2023 रोजी सकाळी 7.46 वाजेला जालना स्थानकावर आली. तीचा 5 मिनीटाचा थांबा झाल्यानंतर ती नांदेडसाठी रवाना होत होती. त्याच वेळी एक प्रवाशी धावत धावत आला. आणि चालत्या रेल्वेत बसण्याचा प्रयत्न करु लागला. त्याने दरवाजाला धरुन रेल्वेच्या पायरीवर पाय दिला. परंतु, गाडीचा वेग वाढला होता. त्याच वेळी त्याचा पायरीवरचा पाय सटकला. त्यामुळे प्रवासी रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला. सदरील प्रवाशी हा रेल्वेखाली जात असल्याचे पाहुन स्टेशनवरील आरपीएफ चे जवान आसाराम झुंजरे आणि एका प्रवाशाने रेल्वेखाली जाणार्या प्रवाशाकडे धाव घेतली. आणि रेल्वेखाली जाणार्या प्रवाशाला ओढून बाहेर काढले. या घटनेचा थरार हा सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.