अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील शिक्षिका असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तथा मराठा समन्वय परिषद राज्य कार्याध्यक्षा अनिताताई काळे पाटील यांचा सिंदखेडराजा (जि. बुलढाणा) येथे गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला. राजमाता जिजाऊंच्या विचारांचा समाजात जागर करुन सामाजिक क्षेत्रात देत असलेल्या योगदानाबद्दल काळे यांचा जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय संघटक मयुराताई देशमुख व मराठा समन्वय परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. शारदाताई जाधव यांनी सत्कार केला.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त सिंदखेडराजा येथील जिजाऊंच्या जन्मगावी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी हा सन्मान करण्यात आला. अनिता काळे या भिस्तबाग येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, त्या सामाजिक क्षेत्रात मागील दोन दशकापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. जिजाऊ ब्रिगेडच्या विविध पदांवर त्यांनी काम केले असून, सध्या त्या मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षपदाची धूरा सांभाळत आहे. राजमाता जिजाऊंच्या विचाराने भावी पिढी घडविण्याचे कार्य त्या करत आहे. जिल्हा परिषदेतील शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी त्यांनी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण देण्याची सुरु केलेली मोहिम व महिला सक्षमीकरणाचे त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याची भावना मयुराताई देशमुख यांनी व्यक्त केली. महिला सक्षमीकरण व गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी काळे यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांनी जिजाऊ ब्रिगेडसह मराठा समन्वय परिषदेच्या माध्यमातून महिलांचे उत्तम संघटन केले असल्याचे डॉ.शारदाताई जाधव यांनी सांगितले. नुकताच त्यांना मुंबई येथे भारत गौरव राष्ट्रीय चेतना पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठा समन्वय परिषदेच्या सर्व महिला पदाधिकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले.