केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदाचा अर्थसंकल्प संसदेच्या सभागृहात सादर करत आहेत. यावेळी अर्थमंत्र्यांनी गरिबांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. गरिबांना पुढील वर्षभर म्हणजेच १ जानेवारी २०२४ पर्यंत मोफत अन्नधान्य मिळणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी महत्वाच्या घोषणा केल्या.
अर्थसंकल्पातील ७ प्राधान्यक्रम यावेळी अर्थमंत्र्यांनी सांगितले. सर्वांच्या सहभागासह विकास (ज्यामध्ये वंचितांसह सर्वांना प्राधान्य दिले जाईल), शेतीसाठी डिजिटल पायाभूत सुविधांना चालना, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न, क्षमतांचा पूर्ण वापर, शाश्वत ऊर्जेकडे वाटचाल करण्याचे प्रयत्न, आर्थिक क्षेत्र आणि युवक विशेष लक्ष यावर अधिक भर दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गरिबांसाठी महत्वाची घोषणा केली. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार २ लाख कोटी रुपये खर्च करत आहे, अशी माहिती देतानाच, अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एका वर्षासाठी वाढवण्यात आला आहे, अशी घोषणा त्यांनी केली. दरडोई उत्पन्न दुपटीने वाढून १.९७ लाख रुपये झाले आहे. या ९ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकसित झाली आहे, हे देखील त्यांनी नमूद केले.