शिवजयंतीचे औचित्य साधून सातारा येथील संग्रहालयात आजपासून छत्रपती शिवरायांचे तख्त (राजगादी) सर्वांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. यामुळे सातरकरांच्या ३४८ वर्षाच्या जुन्या इतिहासाला नव्याने उजाळा मिळाला.
छत्रपती शिवरायांच्या वापरातील हे तक्त ३४८ वर्ष जुने असून हे तख्त जरीचे आणि सोन्याच्या तारापासून बनवलेले आहे. हे तख्त १९६९ मध्ये मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालयाकडून छत्रपती शिवाजी संग्रहालयाला प्राप्त झाल्याचे छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी सांगितले छत्रपती शिवरायांनी हे तख्त रायगड येथे वापरले शिवाय अजिंक्यतारा किल्ल्यावर छत्रपतींचे दोन महिने वास्तव्य होते त्यावेळी सुद्धा हे तख्त तिथे वापरले गेल्याची माहिती शिंदे यांनी दिली . या तक्ता वरून रायगड आणि अजिंक्यताऱ्यावरील वास्तव्यात छत्रपती शिवरायांनी अनेक वाद निश्चितपणे सोडवले होते अशी इतिहासात नोंद आहे. या तख्ताला सोन्याच्या तारा आणि विशेष स्वरूपाचे जरी काम करण्यात आलेले आहे .या तख्ताची देखभाल अतिशय जिकिरीची आणि अवघड अशी असून मागील ५३ वर्षापासून छत्रपती शिवरायांची ही अनमोल ठेव अत्यंत सुरक्षित ठेवण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या मुख्य दालनामध्ये खुले करण्यात आले . विशेष प्रकाश योजनेमध्ये हे तख्त ठेवले असून विद्युत रोषणाईने संग्रहालयाची इमारत झळाळून उठली .नागरिक व समाजसेवी संघटनांच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक वर्षांच्या मागणीनंतर हे संग्रहालय सुरू करण्यास यामुळे आज प्रारंभ झाला. या संग्रहालयात कोविड रुग्णालय उभारण्यात आले होते. त्यातील साहित्य न हलवल्यामुळे संग्रहालय उभारण्यास उशीर होत होता. त्यामुळे साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के यांनी प्रशासनाने शिवजयंतीपर्यंत संग्रहालय सुरू न केल्यास साताऱ्यात मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता .आज या संग्रहालयात छत्रपती शिवरायांच्या तख्त आणि शिव प्रतिमेचे उद्घाटन पत्रकार हरिश पाटणे व विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के , छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे सहाय्यक अभिरक्षक प्रवीण शिंदे, अपशिंगे येथील छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक कापसे आदी यावेळी उपस्थित होते .खासदार उदयनराजे भोसले यांनी संग्रहालयात येऊन छत्रपती शिवरायांचे तख्त (राजगादी) चे दर्शन घेतले.
स्वराज्याची राजधानी साताऱ्यात मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. शहराच्या पुर्व भागात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाकडून यानिमित्ताने शाही दरबार मिरवणूक काढण्यात येणार आहे. भगवे फेटे आणि भगव्या साडीत तब्बल तीन हजार, उंट घोडे,मर्दानी खेळ,१२० ढोल ताशे असणारे पथक, लेझीम पथक, डिजे आवाज घुमणार आहे. यावर्षीच्या शिवजन्मोत्सवात लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, माध्यम प्रतिनिधीं सहभागी होणार असल्याचे संयोजक फिरोजभाई पठाण यांनी सांगितले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूहाकडून जानाई मळाई मंदीरापासून कल्याण पार्क अशी शाही मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात विलासपूर, गोळीबार मैदान, गोडोली परिसरातील सर्व नागरिक सहभागी होणार आहेत. महिलांची दुचाकी रॅली होणार आहे आणि दोन्ही बाईक रॅली शिवतीर्थावर पोहचल्यानंतर सायंकाळी सात वाजता शिवतीर्थावर होणारी महाशिवआरती छत्रपती कल्पनाराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले यांच्या शुभहस्ते व महिला रणरागिनी यांच्या हस्ते होणार आहे. आरती पूर्वी महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर तथा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात विनिता जोशी यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. शिवजयंती निमित्त साताऱ्यात शिवमय वातावरण झाले आहे.
सातारा जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले प्रतापगड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते भवानी मातेचा अभिषेक, महापूजा, ध्वजबुरुज येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण, भवानी माता मंदीरसमोर ध्वजारोहण. पालखी मिरवणूक,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व जय जय महाराष्ट्र माझा या गीतास राज्य गीत म्हणून अंगिकरण्याचा कार्यक्रम. राज्य गीत गायन, पोवाडा गायन व सांस्कृतिक कार्यक्रम, या प्रमाणे कार्यक्रम संपन्न होणार आहे.