शेकडो वर्षांची गुलामगिरी उद्ध्वस्त करून रयतेला हक्काचा स्वराज्य मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज जागतिक किर्तीचे राजेहोते.* आदिलशाह,मोगल,इंग्रज, पोर्तुगीज व जंजिऱ्याचा सिद्धी या परकीय सत्तांसोबत संघर्ष करून त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. या स्वराज्यकार्यात त्यांना जीवाला जीव देणारे अनेक साथीदार लाभले.182 वर्ष जुनी कुतुबशाही औरंगजेबाने एक वर्षात संपवली.187 वर्ष जुनी आदिलशाही त्यानं दीड वर्षात जिंकून घेतली.पणअवघ्या पस्तीस -चाळीस वर्षापूर्वी स्थापन झालेलं मराठयांचं स्वराज्य औरंगजेबाला जवळपास 27 वर्ष संघर्ष करूनसुद्धा जिंकता आलं नाही.असं का झालं, हे समजून घ्यायचं असेल,तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्राचा अभ्यास करावा लागतो.छत्रपती शिवाजी महाराजांना या स्वराज्य कार्यात त्यांचे अनुयायी व सहकाऱ्यांची निष्ठा का लाभली यावर भाष्य करताना सेतु माधवराव पगडी लिहीतात,” महाराजांना चिकटून राहणारे जे अनुयायी होते त्यांना महाराजांच्या बद्दल नितांत आदर का वाटत होता, तर हा मनुष्य वेळ प्रसंगी आपले प्राण धोक्यात घालावयाला मागेपुढे पाहत नाही.हा मागे उभा राहून तोंडपाटीलकी करणारा नाही, किंवा उंटावरून शेळ्या हाकणारा नाही. ‘तुम्ही पुढे जा’ म्हणणारा नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा तो आपला जीव धोक्यात घालायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही, हे कळल्यावर महाराजांचा जिथं घाम पडला तिथं लोकांनी आपले रक्त सांडलेले आहे”.युद्ध हे फक्त शस्त्राच्या न्हवे तर आत्मविश्वासाच्या बळावर जिंकता येतात.मनानं खचलेली,आत्मविश्वास हरवून बसलेली माणसं रणात जिंकू शकत नाहीत.कारण पराभव पहिल्यांदा रणात नाही तर मनात होतो.शिवाजी महाराजांनी आत्मविश्वासू मावळ्यांची फौज उभी केली.म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या पश्चातसुद्धा त्यांच्या तालमीत तयार झालेले मराठे खंबीरपणाने लढले.
शिवरायांनी वतनदारी व जहागिरीची प्रथा मोडीत काढून वेतनदारी पद्धत सुरू केली.सैन्याला रोख पगार दिला.वतनदारी संपवल्याने पूर्वी जे वतनदार रयतेवर मन मानेल तसा अन्याय-अत्याचार करायचे,करायचे त्याला आळा बसला.
पायदळ व घोडदळ हे महाराजांच्या सैन्याचे दोन प्रमुख अंग होते.सरनोबत हा पायदळ व घोडदळाचा सर्वोच्च अधिकारी असे. घोडदळाचे दोन प्रकार होते. एक शिलेदार व दुसरा बारगीर. ज्याच्याकडे स्वतः च्या मालकीचा घोडा व शस्त्रास्त्र तो शिलेदार,तर ज्यांना लढाईच्या वेळी शस्त्रास्त्र व घोडा सरकारातून मिळत असे तो बारगीर.स्वराज्यात शिलेदारापेक्षा बारगिरांची संख्या अधिक होती. शत्रु सैन्यापासून स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी शिवरायांनी अनेक किल्ले जिंकले, काही नवीन बांधले तर काहींची डागडुजी केली.तोफखान्याचा प्रभावी वापर केला.मध्ययुगात ‘ज्यांचे किल्ले त्यांचं राज्य’ आणि ‘ज्यांचं प्रबळ आरमार त्यांचाच समुद्र’ हे सत्तासूत्र होतं. ते ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुबंदीसारख्या धार्मिक नियमांना भीक न घालता सागरी सीमांचे संरक्षण करण्यासाठी 1657 मध्ये आरमार दलाची उभारणी केली.
शिवरायांच्या युद्धशास्त्राचा कणा म्हणजे स्वराज्याचं गुप्तहेर खातं.ज्याच्या सोबत लढायचं आहे त्याची खडा न खडा माहिती काढणारे बहिर्जी नाईक यांच्यासारखे अनेक कार्यकुशल गुप्तहेर महाराजांच्याकडे होते,म्हणून महाराजांच्या युद्धमोहीमा यशस्वी होत असत.मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना शिवरायांच्या गुप्तहेरखात्याबद्दल लिहितो,” शिवाजी महाराजांचे हेरखाते इतके जबरदस्त होते, कि शाहिस्ताखानाच्या छावणीमध्ये एखादी लहानशी गोष्ट जरी घडली, पान जरी हलले, तरी त्याची माहिती सिंहगडावर महाराजांना मिळत होती. त्यांनी आपल्या हेराकरवी शाहिस्तेखानाच्या छावणीमधील सगळी बितंबातमी काढली होती.रस्ते,बाजार,जागा, मोक्याचे ठिकाण,छापा कुठे घालावा, केव्हा घालावा, चौकी पहारे केव्हा गाफील असतात,केव्हा जागरूक असतात याची सगळी माहिती त्यांनी पहिल्यांदा काढलेली होती”.आपली कमीत कमी हानी व शत्रुपक्षाचे जास्तीत जास्त नुकसान कसे होईल याप्रमाणे युद्ध मोहिमांचे नियोजन केलं जात होतं.घनदाट जंगल व सह्याद्रीचे ताशीव कडे याच्या जोरावर महाराजांनी अनेक शत्रूंना धूळ चारली.1664 साली मोगल अधिकाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज लिहितात,
“एक विजयही मिळालेला नसताना आपण जय मिळवीत आहोत अशा प्रकारची पत्रे तुम्ही बादशहाला पाठवीत आहात. तुम्हाला कल्पना नाही की माझा देश इतका दुर्गम आहे,की येथे तुमचे घोडदळ तर जाऊ द्या,कल्पनेतला घोडा सुद्धा नाचवणे शक्य नाही.” इतका बलाढ्य अफजलखान पण महाराजांनी त्याला जावळी खोऱ्यासारख्या दुर्गम ठिकाणी येण्यास भाग पाडले व त्याचा निःपात केला.महाराजांच्या युद्धशास्त्राचा उलगडा करताना सर जदुनाथ सरकार लिहितात,” महाराजांना यश मिळाले याचे कारण म्हणजे त्यांना राजकारणात आपले सामर्थ्य आणि मर्यादा, आपले आणि शत्रूचे बळ, केव्हा धाडस करावे, केव्हा माघार घ्यावी इत्यादी गोष्टींचे अचूक ज्ञान होते हे होय.”म्हणजे आपली बलस्थानं ओळखणं आणि शत्रूच्या उणिवा शोधून त्याला नामोहरम करणं हे कित्येक प्रसंगात महाराजांनी केलेलं दिसतं.
छत्रपती शिवरायांच्या सैन्याला अतिशय कडक शिस्त होती. मोगलांचा इतिहासकार खाफीखान शिवरायांच्या सैन्यातील शिस्तीबद्दल लिहितो,” त्याची(शिवरायांची)शिस्त कडक, वागणूक कडक, सैन्याला जरब मोठी.आणि कोठे गेलात तरी अनाथ,दीनदुबळे, यांच्यावर हात टाकावयाचा नाही. स्त्रियांच्यावर हात टाकावयाचा नाही याबद्दल ते कसोशीने दक्षता घेत असत.” ज्या काळात शत्रूचं सैन्य प्रचंड व्यसन करत होतं, त्याच काळात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे मावळे निर्व्यसनी होते. म्हणूनच हा खाफिखान “शिवाजीच्या राज्यात मद्याला प्रतिष्ठा नाही.” असे लिहून ठेवतो.
चिपळूणजवळ मराठ्यांच्या सैन्याची छावणी पडली असता आपल्याच सैन्याकडून आजूबाजूच्या रयतेला त्रास होत असल्याची बातम्या महाराजांच्या कानावर येत होत्या.त्यावेळी13 मे 1671 रोजी त्यांनी सदर छावणीच्या जुमलेदार व हवालदारांना खडसावणारं आज्ञापत्र लिहिलं आहे.’शेतकऱ्याच्या गवताची काडीसुद्धा विनामोबदला घेऊ नका,शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका.अन्यथा रयत म्हणेल,’मोगल मुलकांत आले त्याहून अधिक तुम्ही’.आणि तुम्ही असे वागाल तर ‘मराठीयांची इज्जत वाचणार नाही.’ स्वयंपाकासाठी केलेल्या आगट्या व रंधनाळे व्यवस्थित विझवा.संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपी जावा,नाहीतर अविस्त्राच(अचानक) उंदीर वात नेईल व पावसाळ्यासाठी साठवून ठेवलेले गवताचे खण जळून खाक होतील.रयतेचा इतका बारकाईने विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते.म्हणूनच ते रयतेचे राजे म्हणून ओळखले जातात.
शिवरायांनी जाती-धर्मात भेदाभेद न करता आपल्या सर्व सहकाऱ्यांवर जीवापाड प्रेम केलं.कान्होजी जेधे यांच्या आजारपणात त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांना 2 सप्टेंबर 1660 रोजी पाठवलेल्या पत्रात महाराज लिहितात ‘औषध घेऊन शरीरासी आरोग्य होई ते करणे.’ युद्धात जखमी झालेल्या सैनिकावर योग्य ते औषधोपचार व युद्धात कामी आलेल्या सैनिकांच्या कुटुंबाची काळजी छत्रपती शिवाजी महाराज घेत असत.’आपल्या पश्चातसुद्धा आपलं कुटुंब उघड्यावर पडणार नाही, हा विश्वास मावळ्यांमध्ये रुजला होता. म्हणूनच माणसं स्वराज्यासाठी आपल्या सर्वस्वाचं बलिदान करण्यास पुढे येत होती.
युद्धमोहिमेवर असताना मराठ्यांच्या छावणीत कुठल्याही प्रकारचा डामडौल नसे.महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना महाराजांच्या सैन्याच्या छावणीचं वर्णन फ्रेंच लोकांनी केलं आहे.ते लिहितात,”मराठ्यांचे इतके मोठे सैन्य पडलेले आहे.एवढ्या मोठ्या सैन्यामध्ये फक्त दोन लहान तंबू आहेत.एक महाराजांसाठी आणि एक प्रधानासाठी.बाकी सगळं सैन्य उघड्यावर आहे.”युद्धमोहिमेवर जाताना स्त्रिया व बाजारबुणगे यांना सोबत नेऊ नये हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सक्त आदेश सैनिकांना होते.त्यामुळे शत्रूच्या तुलनेत मराठा सैन्याच्या वेगवान हालचाली होत असत. वेगवान हालचालीने शत्रुपक्षाचे अंदाज चुकवणे,हे छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्धशास्त्र होतं. 1670 साली मोगल सरदार महाबतखान दक्षिणेत आला.त्याच्या सैन्याच्या छावणीचं वर्णन मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना यानं सविस्तर केलं आहे.याच सक्सेनाच्या लिखाणाचा संदर्भ देत सेतू माधवराव पगडी लिहितात,”या महाबतखानाला मेजवान्या झोडण्याची भारी हौस.काबुल कंधारच्या चारशे नर्तिका महाबतखानाच्या छावणीत हजर आहेत.आणि हे म्हणे मराठ्यांशी लढणार आहेत! जे मराठे हातामध्ये कांदा आणि भाकर घेऊन चाळीस-चाळीस मैलाची दौड करतात.ज्यांना झोपायला वेळ नाही.दुपारच्या वेळी जे आसरा काही पाहात नाहीत.फक्त चार भाले रोवतात व त्याच्यावर घोंगडी टाकून त्या सावलीमध्ये झोप काढतात.”प्रसंगी भुकेच्या वेळी काही नाहीच मिळालं तर ज्वारीची कणसं हातावर चोळून पोट भरणाऱ्या मराठ्यांसोबत ऐश-आरामात राहणाऱ्या शत्रूचा निभाव कसा लागणार ? संधी असेल तिथे वेगवान आक्रमण व बाजू पडत असेल तर बचावात्मक पवित्रा या शिवतंत्रानुसार मराठे लढले.म्हणूनच त्यांनी इतिहास घडवला.
हो-चि-मिन्ह या व्हिएतनाम च्या क्रांतिकरकाने 11 वर्ष अमेरिकेसोबत संघर्ष केला.बलाढ्य अशा अमेरिकेला पराभूत करण्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची मदत झाली असे तो सांगतो.आज शिवरायांच्या युद्धशास्त्रावर जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू आहे.पाकिस्तानसोबतचा सीमाप्रश्न असेल किंवा चीनच्या सीमेलगत गलवान खोऱ्यात घडणाऱ्या घडामोडी असतील हे धगधगते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला शिवचरित्र प्रेरणादायी ठरतं.मराठा आरमाराचा मोगल,सिद्दी,पोर्तुगीज व इंग्रज यांच्यावर प्रचंड धाक होता.ज्यांनी अरबी समुद्रावर अमर्याद सत्ता गाजवली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्धशास्त्रविषयक दृष्टिकोन आज आपण विसरलो,म्हणूनच आपल्या देशाला 26/11 सारख्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला सामोरं जावं लागलं.देशाच्या संरक्षणविषयक प्रश्नांवरचं उत्तर शोधत असताना आपली गुप्तचर यंत्रणा अधिकाधिक प्रभावी करावी लागेल.छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्धशास्त्र समजून घेतलं तर दहशतवादासारखा प्रश्न सोडवण्यास मदत होईल. सर्वांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा.
– प्रा.विक्रम कदम