बुलडाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुलडाण्यात बारावीच्या परीक्षेआधीच गणित विषयाचा पेपर फुटला आहे. सकाळी १० वाजेपासूनच हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे हा पेपर नेमका कुणी आणि कसा फोडला? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी १०:३० वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गणिताचा पेपर परीक्षेआधीच अनेक विद्यार्थ्यांकडे पोहोचल्याचा संशय आहे. सिंदखेड राजा येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे.
याबाबतची अधिकृत माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून मिळालेली नाही. या पेपरफुटीनंतर आता बोर्ड याबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र, पेपर फुटल्याने जिल्ह्यात मोळी खळबळ उडाली आहे.
विशेष बाब म्हणजे याआधी सुद्धा यवतमाळ जिल्ह्यात बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर फुटला होता. तर हिंदी पेपरमध्ये चुका झाल्याचे पुढे आले होते. तर इंग्रजीचा पेपर फोडून विद्यार्थ्यांसाठी कॉपी तयार करणाऱ्या परभणीतील सहा शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे असतानाही पुन्हा एकदा बारावीचा पेपर फुटल्याने परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.