जालना शहरात कुठे कधी काय घडेल याचा नेम नाही, असाच धक्कादायक प्रकार जुना जालना शहरात घडलाय. जुना जालना भागातील मुक्तेश्वर द्वार जवळ चहा पिण्यासाठी बसलेल्या एका मुद्रांक विक्रेत्यावर त्याच्या जवळच बसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने प्राणघातक चाकू हल्ला केला. या हल्ल्यात मुद्रांक विक्रेते संभाजी उर्फ सुहास संपतराव ढेंगळे यांना गळ्याजवळ चाकू लागल्याने जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जालना शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना आज दि. 2 मार्च रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडलीय.
शहरातील रजिस्ट्री ऑफीस जवळ मुद्रांक विक्रेता संभाजी डेंगळे यांची दुकान आहे. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ते दुकानाजवळ सलेल्या मुक्तेश्वर व्दार येथील चहाच्या हॉटेलवर मित्रांसह चहा पीत बसले होते. त्यांच्या बाजुला एक अनोळखी इसम बराच वेळ त्यांच्यासोबत बसला होता. त्यांच्या गप्पा सुरु असतांना काही वेळातच शेजारी बसलेल्या व्यक्तीने संभाजी ढेंगळे यांच्या मानेवर चाकू हल्ला केला आणि पळून गेला. तो पळत असतांना उपस्थितांनी त्याला खुर्च्या फेकून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला त्या लागल्या नाहीत. त्यामुळे तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. संभाजी ढेंगळे यांच्या मानेला मोठी जखम झाली असून त्यांच्यावर एका रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मझहर, पोलीस उपनिरीक्षक नांगरे, कैलास जावळे आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही कॅमेर्याची पाहणी केली. या घटनेतील आरोपीच्या शोधासाठी एक पथक रवाना करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.