जालना – छोट्या-छोट्या गोष्टीवरून वाद, कलह गावपातळीवर सोडविले पाहिजेत. प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या असतात, त्यांनी सामंजस्यांनी प्रकरण सोडविले पाहिजेत. जे गाव पातळीवर प्रॉब्लेम सॉल होतात ते मोठ-मोठ्या कोर्टात पण लवकर सॉल होत नाहीत. आपल्या गावाच्या एकतेची जी शक्ती असते ती कुठेच नसते. त्यामुळे सर्वांनी जात, धर्म, पंत विसरुन सर्वांनी गुण्या-गोविंदाने वागलं पाहिजे. भेदभाव विसरुन आणि एकोप्याने रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मौजपुरी येथे एक दिवशीय प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड बोलत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दि. 1 एप्रिल 2023 ते 1 मे 2023 दरम्यान समता पर्व साजरा करण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय राडोड, पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा सरकारी वकील अॅड. बाबासाहेब इंगळे, उप विभागीय अधिकारी संदीप सानप, उप विभागीय पोलीस अधिकारी राजु मोरे, तहसिलदार छाया पवार, सहाय्यक आयुक्त अमित घवले, गटविकास अधिकारी एस.आर.कुलकर्णी, प्रबोधनकार शाहीर आप्पासाहेब उगले, संस्थेच्या अध्यक्षा करुणा मोरे, सरपंच ज्योती राऊत, रोहीणी बळप यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, साजिक न्याय विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येत असतात, लोकहिताच्या योजना, तळागळापर्यंत पोहोचवल्या जातात. गाव पातळीवर एकोपा राहण्यासाठी आपण गावपातळीवर कार्यक्रम घेत आहोत. समानता हा भारतातील सर्वांना मिळालेला अधिकार आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार, कायद्यासमोर स्त्री-पुरुष आणि सर्व जाती-धर्माला समानता आहे. कायद्याने सर्वांना एकच कायदा लागू आहे. सर्वांना एकाच पध्दतीने संरक्षण दिले जाते. असेही जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले.
जात, धर्म, पंत, लिंग यावर आधारीत कोणताही भेदभाव करता येणार नाही, आपण माणसा-माणसात भेदभाव करु नये, आपल्याला जवेढे अधिकार आहेत तेवढेच अधिकार सर्वांना आहेत. त्यामुळे आपण प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. संताने देखील एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंत असा संदेश दिलाय, त्यामुळे एकमेकांच्या सहकार्याने आपला विकास होईल. त्यामुळे आपले गाव विकसीत होईल, त्यानंतर तालुके विकसती होतील, जिल्हा विकसीत होईल, आणि आपले राज्य, देश विकसीत होईल. देशाला डेव्हलोप करायचे असेल तर गाव पातळीवरच सुरुवात करावी लागेल. ज्या गावात शांतता नाही, एकोपा नाही, ती गावे पुढे जावू शकत नाहीत. असेही जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी म्हटले. जी गावे पुढारलेली आहेत त्या गावात एक गोष्ट कॉमन असते. ते गाव डेव्हलोपमेंन्टच्या हिशोबाने काम करीत असते. जी गावे पुढे गेलेत तीथे आरोग्य, शिक्षण, जलसंवंर्धन, यावर फोकस केल्यानेच ती गावे पुढे गेलीत, त्यामुळे आजुबाजुच्या गावांनी देखील एकत्र बसलं पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय रोठोड यांनी केलं.
यावेळी बोलताना श्री. राठोड म्हणाले की, जालना जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण जास्त आहे. जोपर्यंत समाजात बाल विवाह या गोष्टीचा तिरस्कार केला जात नाही, तोपर्यत ती गोष्ट संपणार नाही, हा बालविवाह लावणे कायद्याने गुन्हा आहे. तुमच्या गावात जर असा बाल विवाह होत नसेल तर अभिमानाची गोष्ट आहे. बालविवाह लावल्यामुळे मुलीचे शिक्षण थांबते, तिचा शारीरीक विकास थांबतो, ती सक्षम महिला बनण्यास समर्थ राहत नाही, तीचे सर्व स्वप्न चुरगळून टाकली जातात. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून जालना जिल्ह्यात बाल विवाह होऊ द्यायचा नाही. आपला जिल्हा बाल विवाह मुक्त करुन ही प्रथा बंद केली पाहिजे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केलं.
यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंडू डोंगरे, बालाजी बळप, बद्रीनारायण भसांडे, अंकुश काळे, रामकृष्ण हिवाळे, अनिरुध्द डोंगरे, भागवत राऊत, अच्युत मोरे,
मोबाईल हे घातक शस्त्र आहे, त्याचा जपून वापर करा : पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे
आपल्या सर्वाच्या हातात एक घातक शस्त्र आहे. ते सर्वजन वापरतात ते म्हणजे मोबाईल आणि याचा वापर जसा चांगल्या कामासाठी होतो तसाच वापर वाईट कामासाठी केला जातोय. बर्याच ठिकाणी लहान-लहान मुलं देखील जाती, धर्माबद्दल स्टेटस ठेवतात. त्यामुळे धार्मिक वातावरण बिघडते. आणि अशा धार्मीक भावना भडकविण्याबद्दल गुन्हा दाखल झाल्यास भविष्यात खाजगी आणि सरकारी क्षेत्रात देखील नोकरी मिळणार नाही. सध्या नोकरी मिळणं फार अवघड आहे. अशा छोट्या कारणामुळे जरी नोकरी नाकारली तर भविष्य अवघड आहे. त्यामुळे मोर्बालचा, सोशल मिडीयाचा वापर काळजीपुर्वक करा, मेसेज वाचल्याशिवाय फॉर्वड करु नका. असे आवाहन पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी केले.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की ऑनलाईन फ्रॉड पासुन वाचण्यासाठी काळजी घ्यावी, ऑनलाईन फोनवर एटीएम चा पिन किंवा फोन पे चा पिन नंबर कुणालाही देऊ नका, एखादे अॅप डाऊनलोड करायला सांगीतलं तर ते करु नका अन्यथा आपल्या मोबाईलचो कंट्रोल दुसर्याकडे जातो. तसेच एटीएमचा व्यवहार करतांना देखील काळजी घ्यावी. टेक्टॉलॉजीचा वापर करुन अनेकजन फसवणूक करीत आहेत. त्यामुळे आपली फसवणूक होऊ नये याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी केले.
भारताच्या राज्यघटनेत समता हा शब्द आलाय. भारतातील सर्व जनतेला समानता दिली आहे. कुठलाही भेदभाव राज्यघटनेने मानलेला नाही. भारताच्या स्वतंत्र्यानंतर सर्वांनी ही राज्य घटना मान्य केली आहे. भारतात विविध धर्म, पंथ आणि जाती आहेत. आणि प्रत्येकजन आपला सन, उत्सव शांतपणे आणि उत्साहात साजरा करतात. एका गावात पाहिले तर सर्व जाती धर्माचे लोक असतात. हा आपला इतिहास आहे. हा सर्व समाज जोपर्यंत एकत्र नांदत नाही तोपर्यंत गावचा विकास होत नाही, त्या देशात शांतता नाही, ज्या देशात काही ना काही युध्द चालु आहे त्या देशात विकास नाही. भारतात जो विकाय आहे तो आपण एकोप्याने राहत असल्याने झालाय. असाच एकोपा कायम राहिला पाहिजे. असेही पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी म्हटले.
अॅट्रोसिटी कायद्याचा वापर करण्याची गरजच पडू नये ः अॅड. बाबासाहेब इंगळे
यावेळी जिल्हा सरकारी वकील अॅड. बाबासाहेब इंगळे म्हणाले की, जन्माने प्राप्त झालेली जात जात नाही असे म्हणतात, जातीची ही उतरंड असून त्यात काही जाती उच्च तर काही खालच्या समजल्या जातात. त्यामुळे पुर्वीच्या काळात हीन दर्जाची कामे ही खालच्या जातीच्या लोकांकडून करुन घेतली जायची. ही परिस्थीती आज आपल्याला बदललेली दिसते. आजही थोड्याफार प्रमाणात या घटना पहायला मिळतात. अस्पृस्य समजल्या जाणार्या जातींना डिवचले जावू नये म्हणून अनु. जाती जमाती प्रतिबंधक कायदा आंमलात आलेला आहे. हा कायदा आंमलात आल्याने जातीभेद व्यवस्था बंद झालेली आहे. त्यामुळे सर्वांना समान जगण्याची संधी मिळालेली आहे. चांगल्या गोष्टी माणून सहजा सहजी स्विकारत नाही. त्याला कायद्याचा बडगा दाखविल्याशिवाय माणसात सुधारणा होत नाही. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. या कायद्याचा वापर करण्याची गरजच पडू नये यासाठी आपण गुण्या-गोविंदाने रहायला पाहिजे. परंतु, माणसाचा स्वभाव आहे. भावा-भावात देखील पटत नाही, त्यामुळे त्यांना कोर्टात, पोलीस ठाण्यात जावे लागते. अशाच घटना काही समाजासोबत घडतात त्यामुळे दुदैवाने या कायद्याचा वापर करावा लागतो. असेही अॅड. इंगळे यांनी म्हटले.
शुल्लक कारणावरुन वाद करुन कोर्टात गेल्यावर दोन्ही पार्टीला मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे सर्वांनी एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने रहावे असे आवाहन जिल्हा सरकारी वकील अॅड. बाबासाहेब इंगळे यांनी केले.
सामाजिक कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते सत्कार
मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामाजिक एकोप्यासाठी नेहमीच प्रयत्न करणार्या आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करणार्या सामाजिक कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि पोलीस अधिक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये बालाजी बळप, आदर्श शेतकरी अंकुश काळे, बंडूभाऊ डोंगरे, दिपक आढाव, एकनाथ खरात, संदीप गावडे यांच्यासह प्राणीमित्र, सर्प मित्रांचा सत्कार करण्यात आला. तसेच गावाच्या हितासाठी नेहमीच प्रयत्न करणारे ग्रामविकास अधिकारी प्रविण पवार, तलाठी आर.डी. हजारे यांचाही गौरव जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते करण्यात आला.