संपूर्ण जगभरात सध्या गर्मीने कहर केला आहे. प्रचंड उष्णता आणि उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वातावरणात होणारे हे बदल आता माणसाला असह्य होऊ लागले आहे. दुपारी उन्हात बाहेर पडणं तर जवळपास अशक्य झालं आहे. या उन्हात डिहायड्रेशनचा त्रास होण्याची शक्यता असल्याने नागरिकही घराबाहेर पडताना काळजी घेत आहेत. पण जर तुम्ही याच गर्मीत एका बंद कारमध्ये 12 तासांहून जास्त काळ अडकलात तर काय होईल. विचार करतानाही तुम्हाला गुदमरल्यासारखं वाटत असेल ना….पण एका महिलेच्या बेजबाबदार वागण्यामुळे याच गर्मीत तिच्या दोन महिन्याच्या बाळाला जीव गमवावा लागला आहे.
भीषण गर्मीत कारमध्ये अडकल्याने एका 2 वर्षाच्या चिमुरडीला जीव गमवावा लागला आहे. जवळपास 15 तास ही चिमुरडी कारमध्ये अडकलेली होती. पोलिसांनी याप्रकरणी वडील क्रिस्टोफर मकलीन आणि आई कॅथरीन एडम्स यांना बेड्या ठोकल्या आहेत. चिमुरडीच्या शरिराचं तापमान 41.6 सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. कारमध्ये 4 वर्षाचा मुलगाही बंद होता. पण तो वाचला आहे. त्याला सध्या बालसंरक्षण विभागाकडे सोपवण्यात आलं आहे. डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये ही घटना घडली आहे. कारमध्येच चिमुरडीचा मृत्यू झाल्याने सर्व परिसरात हळहळ व्यक्त होत होती. चौकशी केली असता त्यांची आईच त्यांना कारमध्ये विसरली होती हे समोर आलं. महिलेला जेव्हा आपण मुलांना कारमध्येच सोडून दिलं असल्याचं लक्षात आलं तेव्हा तिने धाव घेतली. यावेळी लहान मुलगी बेशुद्ध पडली होती. तिने आपातकालीन सेवेला फोन केला होता. पण जोपर्यंत ते पोहोचले तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलं कारमध्ये झोपलेली असताना महिला त्यांना सोडून गेली होती. यानंतर ती त्यांना विसरली होती. दोन्ही मुलं दुसऱ्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत कारमध्ये होती. 16 मे रोजी ही घटना घडली आहे. “दोन्ही मुलं कारमध्ये झोपली होती. त्यांना कारमध्ये तसंच ठेवून, आपण घरी जाऊन झोपू असं दांपत्याने ठरवलं होतं. दुपारी 3 वाजेपर्यंत दोघे झोपले होते. यावेळी आपण मुलांना कारमध्येच ठेवलं असल्याचं लक्षात आलं,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी जेव्हा घराची झाडाझडती घेतली तेव्हा घरात अंमली पदार्थ सापडले. ड्रग्जमुळेच चिमुरडीचा मृत्यू झाल्याचं पोलीस म्हणाले आहेत. ड्रग्ज घेतले असल्याने दांपत्याचं मुलांकडे दुर्लक्ष झालं असं पोलिसांनी म्हटलं आहे.
पोलिसांनी याप्रकरणी एडम्स आणि मकलीन या दोघांनाही अटक केलं आहे. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी तसंच मुलीबाबत बेजबाबदारपणे वागणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन केल्यानंतर इतर आरोप लावले जातील असं पोलीस म्हणाले आहेत.