जालना : जालन्यातील महावितरण कार्यालयात बदली करवून घेत स्वतःची डिजेवर मिरवणूक काढून घेणं एका सहाय्यक अभियंत्यांला चांगलंच महागात पडलं आहे.या अभित्यांसह 20 ते 30 जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवाय महावितरणनं देखील या अभित्यांच्या मिरवणुकीवर नागरिकांनी केलेल्या टिकेनंतर त्याला निलंबित केलंय. प्रकाश चव्हाण असं निलंबित झालेल्या अभियंत्याचं नाव आहे.
महावितरण अभियंत्याची डिजे लावून एन्ट्री दोन तास जंगी मिरवणूक, शहरात चर्चेला उधाण आशा बातम्या माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या होत्या. आपल्या या गैरकृत्यामुळे महावितरण कंपनीची प्रतिमा जनमाणसामध्ये मलीन झाली आहे. तसेच वरिष्ठ कार्यालयाने केलेली बदली रद्द करून आणल्याबाबत आनंदोत्सव साजरा करणे म्हणजे यामधून आपला शिरजोरपणा, उर्मटपणा, उध्दटपणा तसेच असभ्य वर्तन स्पष्टपणे दिसून येते. तसेच वरिष्ठांबद्दल अनादरभाव, कामावर असतांना बंद वर्तन केले असल्याचे स्पष्ट होत असल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.
याचं झालं असं की, महावितरणचे सहाय्यक अभियंता प्रकाश चव्हाण हे आधी जालन्यातील कन्हैयानगर भागातील महावितरण कार्यालयात कार्यरत होते. त्यांच्या विरोधात ग्राहक आणि नागरिकांच्या तक्रारी आल्यानं त्यांची महिनाभरापूर्वी रत्नागिरी येथे बदली करण्यात आली होती. पण तेथून आणखी त्यांची बदली जालन्यातील महावितरणच्या फेज थ्रीमध्ये करण्यात आली. बदलीचा चव्हाण आणि त्यांच्या अखत्यारित असलेल्या कॉन्ट्रॅक्टना आनंद झाला. आणि कॉन्ट्रॅक्टरनी चव्हाण हे शहरांत दाखल होताच त्यांची पोलिसांची परवानगी न घेता डीजेवर डान्स करत मिरवणूक काढली. या मिरवणुकीनंतर सदर बाजार पोलिसांनी अभियंता प्रकाश चव्हाण यांच्यासह 20 ते 30 जणांवर गुन्हा दाखल केला. आणि महावितरणवर झालेल्या शहरातील नागरीकांकडून टीकेनंतर प्रकाश चव्हाण यांच्या निलंबनाचे आदेश काढले. त्यामुळे मिरवणूक अखेर या सहाय्यक अभियंत्यांच्या चांगलीच अंगलट आली असल्याचे यावरून दिसून येत आहे..