पुणे : शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. पुण्यातील हडपसरच्या म्हाडा वसाहतीत कोयता टोळीने पुन्हा एकदा राडा घातल्याचा प्रकार घडला. यामध्ये २३ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील हडपसर परिसरात असलेल्या एका नामांकित कॉलेजमध्ये कोयता गॅंगने राडा घातल्याचे समोर आले. कॉलेजमधील झालेल्या किरकोळ वादानंतर आठ ते दहा जणांनी हातात कोयते घेऊन हडपसर गोसावी वस्ती परिसरात धुमाकूळ घालत तरुणावर कोयत्याने हल्ला केला.
या हल्ल्यामध्ये मिलिंद मधुकर कांबळे (वय २३) हा तरुण गंभीर जखमी झाला. किरकोळ वादानंतर टोळक्याने हातात कोयते घेत मिलिंद राहत असलेल्या परिसरात येवून हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हडपसर पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.