जालना – शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता, दिवाबत्ती आदी नागरी प्रश्नावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या नेतृत्वात जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना प्रचंड घोषणाबाजी करीत घेरावा घालण्यात आला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख रावसाहेब राऊत, बाबुराव पवार, युवासेनेचे भरत सांबरे, जिल्हा युवाअधिकारी शिवाजी शेजुळ, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, महीला आघाडी जिल्हासंघटक मंगल मेटकर, गंगुताई वानखेडे,
मंजुषा घायाळ, यांची उपस्थिती होती. यापूर्वीही शिवसेनेच्या वतीने कन्हैयानगर येथील रस्त्यासाठी तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांना घेराओ आंदोलन करून सदरील रस्ता दुरुस्तीची मागणी केली, जालना शहरातील खराब रस्ते दुरुस्त करावेत या मागणीसाठी नूतन वसाहत रस्त्यावर खड्डे मोजून त्यांचे नामकरण करण्याचे अनोखे आंदोलन केले.
तसेच दीड वर्ष बंद असलेली मूर्ती वेस सुरु व्हावी यासाठी शिवसेनेच्या वतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारावर द्वारसभा आंदोलन केले. यानंतरच प्रश्नांवर पालिकेने कारवाई केली. आंदोलना शिवाय कारवाई न करणार्या पालिकेवर शहारातील नागरी प्रश्न घेऊन आयुक्तांना घेराव आंदोलन करुन त्यांचे लक्ष वेधले. यावेळी नागरी समस्या मांडतांना जिल्हाप्रमुख अंबेकर म्हणाले की, जालना शहरातील नागरी समस्यांकडे महानगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. जालना नगर परिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. नंतर शहरातील नागरिकांमध्ये आता नागरी प्रश्न सुटतील व आम्हाला चांगल्या नागरिक सुविधा मिळतील हा आशावाद निर्माण झाला. परंतु जालना शहर महानगरपालिका होऊनही शहरातील रस्ते, स्वच्छता, पाणी, दिवाबत्ती या सर्व नागरी समस्यांनी नागरिक अद्यापही त्रस्त आहेत. शहरातील नागरी समस्या मांडतांना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की, जालना शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणावर डेंग्यूची साथ पसरली असून थंडी, ताप, सर्दी या आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढत्या रुग्णांमुळे सर्व दवाखाने भरलेले आहेत. पण असे असतानाही महानगरपालिकेने मात्र कोणत्याही आरोग्य सुविधा वाढविल्या नाहीत.
शहरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस नसतानाही लक्कडकोट, नूतनवसाहत, भाग्यनगर बाजूचा रस्ता, एसआरपीएफ गेट समोरील रस्ता, सिंधी पंचायत वाड्यासमोरील रस्ता इ. रस्त्यावरून वाहन चालवणे अत्यंत अवघड झाले आहे. हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत श्रीगणेशाच्या आगमनापूर्वी या सर्व रस्त्यांची दुरुस्ती होणे अपेक्षित होते. पण महापालिकेने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. त्यामुळे गणेश भक्तांना यावर्षीही खड्ड्यांच्या रस्त्यावरूनच बाप्पांना स्थापनेसाठी आणावे लागले. या रस्त्यावर खड्डे बुजविण्याच्या नावाखाली अनेकदा मुरूम मिश्रित माती टाकली जाते. जी दोन-चार दिवसात निघून जाते व रस्त्याची अवस्था पूर्वीप्रमाणे कायम राहते. सदरील खराब रस्ते व रस्त्यावरील खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे अपघात यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलने केली. परंतु मुरुमाने खड्डे बुजविण्या पलीकडे महानगरपालिकेने काही केले नाही. त्यामुळे आता तात्काळ डांबरीकरणाचे काम हाती घेऊन सदरील प्रश्न कायमचा मार्गी लावण्यात यावा.
पाणी प्रश्नावर बोलतांना अंबेकर म्हणाले की, जालना शहरासाठी जायकवाडी ते जालना ६५ एमएलडी क्षमतेची पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. आठशे रुपयांची पाणीपट्टी तीन हजार रुपयापर्यंत वाढवली. परंतु तरीही शहरातील अनेक भागात आठ ते दहा दिवसा आड व अनियमित पाणीपुरवठा जालना केला जातो. तसेच पाणी वितरण व्यवस्था ही पूर्णतः विस्कळीत झालेली आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी केली. तसेच शहरातील प्रत्येक भागात नियमित स्वच्छता होत नसल्याने शहरात कमालीची अस्वच्छता निर्माण झाली आहे. यावर्षी पावसाळ्यापूर्वी मोठे नाले स्वच्छ करण्याचे काम प्रशासनाकडून झाली नाही. परंतु पाऊसच न झाल्याने महापालिकेची अब्रू वाचली. तर शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे रोगराईचे प्रमाण वाढत आहे. घनकचरा प्रकल्पाचे काम बंद पडलेले आहे. याकडे त्यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. तर जालना शहरातील सर्व रस्त्यावर मधोमध बसलेली मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे व रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमने त्यामुळे वाहन चालकांना प्रचंड मन:स्तापाला सामोरे जावे लागते. तर मोकाट जनावरे व कुत्र्यामुळे सकाळी शिकवणीसाठी जाणारी मुले-मुली व शहरातील प्रवासी नागरिक यांच्या मनातही याची दहशत निर्माण झालेली आहे. यासंदर्भात अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या मात्र महानगरपालिकेने यावर कोणती कारवाई केली नाही, त्यावर तात्काळ कार्यवाहीची मागणी केली. सध्या गणेशोत्सव असल्याने मोठया प्रमाणावर नागरीक घराबाहेर पडतात. शहरातील अनेक रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. त्यांची वेळेवर दुरुस्ती होत नाही त्यामुळे सर्वत्र अंधार पसरतो याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या सर्व नागरी प्रश्नांमुळे जालना शहर मराठवाड्यातील एक बकाल शहर म्हणून प्रसिद्ध होत आहे. महानगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्य मनोरंजनासाठी नवीन काही निर्माण करणे तर दूरच पण अगोदर निर्माण केलेले रेल्वे, संगीतकारंजे, खेळनी, जलतरण तलाव या सुविधाही वर्षानुवर्षे बंद पडलेल्या आहेत. आताजालना शहरात महानगरपालिका झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या पण बदल मात्र दिसत नसल्याचे ठणकावून सांगितले. मांडलेल्या सर्व समस्यांची दखल घ्यावी व तात्काळ अपेक्षित बदल करून नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. नसता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी दिला.
यावेळी रविकांत जगधने, संदीप नाईकवाडे, विजय पवार, संतोष जमदडे, सखावत पठाण आदीं पदाधिकार्यांची उपस्थिती होती.