जालना – मागील काही दिवसात राज्यातील नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजी नगर आशा मोठया शहारातील येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूमुळे राज्यांत सर्वत्र खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज ९ ऑक्टोंबर सोमवार रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्यासह माजी जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी सभापती मुरलीधर थेटे, तालुकाप्रमुख हरिहर शिंदे या शिष्टमंडळाने जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन डॉ.संजय मेश्राम, डॉ. नितीन शहा, डॉ. नितीन पवार, डॉ.
जायभाये यांच्याशी सविस्तर चर्चा करून रुग्णालयातील एकूण सर्व परीस्थिती
जाणून घेतली.
यावेळी जिल्हाप्रमुख म्हणाले की, राज्यातील रुग्णालयात घडलेल्या घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या मनात शासकीय रुग्णालयाप्रती भीती निर्माण झाली आहे. लोक कल्याणकारी राज्यात गोरगरीब व सामान्य जनतेसाठी शासकीय रुग्णालय हे आधार असतात. दुर्दैवाने गोरगरिबांचा आधार असलेल्या या रुग्णालयात वर्ग-१ संवर्गातील ५० टक्के, वर्ग-३ संवर्गातील ३० टक्के तर वर्ग-४ संवर्गातील ६० टक्के पदे रिक्त असल्याचे दिसून आले. तसेच ११ कोटी रुपये डीपीसी ने मंजुर केल्यानंतरही औषधी व उपकरणाची खरेदी मात्र झालेली नाही. तसेच नुरोसर्जन, कॅथ लॅब, एमआरआय, कॅन्सर युनिट, डायलिसिस या सुविधा नसल्याचे चर्चेतून कळले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, या दोनशे खटांच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या अधिक असल्याने त्याचा ताण यंत्रणेवर पडून रुग्णांकडे दुर्लक्ष होऊन त्यांची हेळसांड होते. परिणामी रुग्णांच्या जीवास धोका निर्माण होतो. या सर्व बाबी अत्यंत चिंताजनक आहेत. अत्यंत सामान्य गोरगरीब नागरिक या रुग्णालयात उपचारासाठी येत असल्याने त्यांना वैद्यकीय मदत व औषधींचा अभाव भासू नये.
राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयात रुग्ण दगावण्याच्या घटनामुळे सामान्य नागरिक व रुग्णांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण करण्यासाठी रुग्णालयात रुग्णांना चांगली वागणूक, पुरेशा प्रमाणात औषधांचा साठा व उत्तम आरोग्य सोयी सुविधा उपलब्ध करून सर्व त्रुटी दूर कराव्यात व सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणीही यावेळी जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर व शिष्टमंडळाने केली.