सातारा हिरकणी (विद्या निकाळजे) – पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते साताऱ्यात प्राथमिक शिक्षकांना पुरस्काराचे वितरण. जिल्हा परिषद शाळा बोडके(माणगंगानगर) ता.माण येथील उपक्रमशील शिक्षीका दयाराणी विलास खरात यांना सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून (प्राथमिक) मिळणारा शिक्षिका पुरस्कार शिक्षण क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सन्मान देऊन प्रदान करण्यात आला.
यावेळी सातारचे खासदार श्रीनिवास पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)शबनम मुजावर उपस्थित होते. दयाराणी खरात यांनी कोविड कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केली होती.त्यांनी कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण चालू ठेवले होते. परंतू,माणमधील बोडके (माणगंगानगर) येथील शाळेचे विद्यार्थी मोबाईल अभावी शिक्षणापासून वंचित असल्याने दयाराणी खरात या शिक्षीका थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन धडे देत होत्या.त्यांच्या ‘शाळा आली अंगणी’या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यात त्यांना यश मिळाले होते.
आंधळी तलावालगत असणाऱ्या बोडके गावांतर्गत पुनर्वसित माणगंगानगर गाव आहे.बहुतांश अशिक्षीत व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे लोक तेथे राहतात.येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये,म्हणून जिल्हा परिषदेची दोन शिक्षीका वस्ती शाळा आहे.अवघे २७ विद्यार्थी शिक्षण घेत असले तरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नेहमीच विद्यार्थ्यांना अडसर ठरते.गत कोरोना काळातही हीच परिस्थिती मैलाचा दगड ठरत होती,शासनाने अॅानलाईन शिक्षणाची उपायोजना केली होती.परंतु,हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातील या वस्तीवरील मुलांना स्मार्टफोन मिळणार कुठून?हा प्रश्न होताच.कोणत्याही परिस्थितीत मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत शाळाच थेट विद्यार्थ्यांच्या अंगणी आणली होती.विद्यार्थ्यांचा अभ्यास घेताना गर्दी टाळण्यासाठी श्रीमती खरात यांनी मुलांचे काही ग्रुप बनवले होते.मग काही जण विद्यार्थ्यांच्या घराच्या अंगणात तर काहीजण शाळेच्या प्रांगणात अभ्यासाचे धडे घेत होते.
खरात यांनी कष्ट व चिकाटीच्या जोरावर शिक्षीका ते मुख्याध्यापक होत समाजापुढे आदर्श ठेवला.त्यांनी राज्यस्तरीय कोरोना जनजागृतीपर अभिव्यक्ती स्पर्धा खुल्या गटात तृतीय क्रमांक मिळवला होता.तसेच बोधी ट्री एज्युकेशन औरंगाबाद यांच्या वतीने प्रसिद्ध लेखक बाबा भांड यांच्या हस्ते राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार २०२२,क्रांतीसुर्य फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने आदर्श शिक्षीका पुरस्कार २०२२,मराठी साहित्य मंडळ मुंबई यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य भूषण पुरस्कार २०२२,मराठी साहित्य मंडळ पुणे यांच्या वतीने प्रसिद्ध लेखक जयप्रकाश घुमटकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले सन्मान,पंचायत समिती माण शिक्षण विभाग यांच्यावतीने तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते आदर्श शिक्षीका पुरस्कार २०२१ यासह अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.त्यांनी कोरोना जनजागृती गीत गायनाच्या माध्यमातून राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळवून कोरोना जनजागृतीत मोलाचे योगदान दिले आहे.कोरोनाग्रस्तांना आर्थिक मदत करून शाळेच्या पट संख्येत वाढ होण्यासाठी शाळेत १०० टक्के उपस्थिती विद्यार्थी गुणगौरव सोहळा दर महिन्याला राबवून विद्यार्थी उपस्थिती वाढवली.अध्यापनाचे व्हिडिओ तयार करून युट्यूबवर अपलोड केले आहेत.शाळेत वृक्षारोपण,परसबाग उपक्रम राबवून बालबाजार,आजी आजोबा सन्मान दिन,सांस्कृतिक कार्यक्रम,परिसर भेट,पत्रलेखन,स्वच्छ सुंदर माझी शाळा इ.सहशालेय उपक्रम राबवून पटसंख्येचा दरवर्षी चढता आलेख राहिला आहे.स्वाध्याय उपक्रम,गोष्टीचा शनिवार,बाल ग्रंथालय स्व.यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय हस्तलिखीत व निबंध स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.संविधान एक आकलन या विषयावर राज्यस्तरीय प्रबंधात लेखन व विवीध विषयावर लेख प्रकाशित झाले आहेत.