बीड – जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ८ वर्षीय चिमुकल्याला धमकावत एका नराधमाने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे. शहरातील शासकीय निरीक्षण गृहात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी निरीक्षण गृहाच्या अधीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.अतिश असं अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव असून तो शासकीय निरीक्षणगृहात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच शहरात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अतिश हा नराधम आरोपी बीड शहरातील नगर रोडवर असलेल्या शासकीय निरीक्षणगृहात कार्यरत होता. १ ऑक्टोबर रोजी त्याने निरीक्षण गृहातील एका ८ वर्षीय चिमुकल्याला धमकावत त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.
याबाबत कुणाला सांगितल्यास त्याला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. दरम्यान, चिमुकल्याने ही बाब निरीक्षण गृहातील त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलांना सांगितली. या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर निरीक्षण गृहातील इतर ३ मुलांनीही आपल्यासोबत असा प्रयत्न झाल्याची माहिती अधीक्षकांना दिली.
या घटनेनंतर निरीक्षण गृहाचे अधीक्षक सुदाम निर्मळ यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अतिश याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.