जालना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सद्यस्थितीत दि. 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविणे सुरू असून या कार्यक्रमांतर्गत दि. 27 ऑक्टोबर 2023 ते 9 डिसेंबर 2023 या दरम्यान दावे व हरकतीचा कालावधी निश्चित केलेला आहे. जिल्ह्यातील ज्या तरुणांना वयाची 18 वर्षे पूर्ण होत असतील अशा सर्व तरुणांनी आगामी काळातील निवडणूकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात शुक्रवार दि.27 ऑक्टोबर 2023 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, निवडणुका पारदर्शक आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. 27 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,मतदार नोंदणी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय व 1699 मतदान केंद्रावर प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रम 27 ऑक्टोबर ते 09 डिसेंबर 2023 या कालावधीत राबवला जाणार आहे. 01 जानेवारी 2024 रोजी किंवा त्या आधी 18 वर्षे पूर्ण केलेले नागरिक या कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच 2024 च्या एप्रिल, जुलै, ऑक्टोबर या महिन्यांच्या 01 तारखेला 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींनाही सदर कालावधीत आगाऊ मतदार नोंदणी करता येईल; मात्र त्या अर्जावरील प्रक्रिया सदर तिमाहीत पूर्ण करण्यात येईल. 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्त्वाची संधी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करावी, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी म्हटले आहे.
प्रारूप यादीमध्ये आपले नाव आहे की नाही या मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे. कारण, बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. तसेच आपले नाव, पत्ता, लिंग, जन्मदिनांक, वय, ओळखपत्र क्रमांक, मतदारसंघ इ. तपशील सुद्धा अचूक आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे. ज्या मतदारांना सदर तपशिलामध्ये दुरुस्त्या करायच्या असतील त्यांनी अर्ज क्र. 8 भरावा. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन अर्हता दिनांकावर आगाऊ मतदार नोंदणी करता येते. त्याप्रमाणे एखाद्याच्या नावासंबंधी हरकत सुद्धा घेता येते. एखाद्या मतदारसंघातील एखादा मतदार यादीत दिलेल्या पत्यावर राहत नसेल, तर अशा नावाबद्दल त्याच मतदारसंघातील अन्य मतदार आक्षेप घेऊ शकतो. त्यामध्ये जर तथ्य आढळून आले तर पडताळणी करून संबंधित मतदाराच्या नावाची वगळणी केली जाते. मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण होण्यासाठी अशा अपात्र मतदारांची वगळणीही महत्त्वाची असते.
दि. 27 ऑक्टोबर 2023 ते 9 डिसेंबर 2023 या दावे व हरकतीच्या कालावधीत दि. 4 व 5 नोव्हेंबर 2023 व दि. 25 व 26 नोव्हेंबर 2023 रोजी 1699 मतदान केंद्रावर मतदार नोंदणी करीता विशेष शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे. जिल्ह्यातील 348 महाविद्यालयात महाविद्यालयीन तरुणांच्या नावनोंदणीसाठी दि. 23 व 24 नोव्हेंबर 2023 रोजी विशेष शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे यासाठी 100 महाविद्यालयांना बॅनर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. महिला मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यातील 10 हजार घरगुती गॅस कनेक्शनवर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत महिला मतदार नोंदणीसाठी आवाहन करण्यात येणार आहे. सोबतच महिलाच्या मतदार नोंदणी शिबिरांसाठी महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ (माविम), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान (एसएसआरएलएम) या शासकीय विभागांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.
दि. 2 व 3 डिसेंबर 2023 रोजी दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या मदतीने दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी, त्यांची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. सोबतच तृतीयपंथी व्यक्ती, शरीरव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, भटक्या-विमुक्त जमाती यांच्यासाठी दि .02 व 03 डिसेंबर 2023 या दिवशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. ही शिबिरे सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सदर समाजघटकांना सोयीच्या ठिकाणी आयोजित केली जाणार आहेत. या समाजघटकांकडे वास्तव्य आणि जन्मतारखेच्या कागदपत्रांची कमतरता लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना स्व-घोषणापत्राची सवलत दिलेली आहे, त्यामुळे हे समाजातील व्यक्ती आता कोणतीही कागदपत्रे नसली तर मतदार नोंदणी करू शकणार आहेत.
ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने 01 ते 07 नोव्हेंबर या कालावधीत राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्विया गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या व्यक्ती, नावांची मतदार यादीतून वगळणी केली जाईल
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमातील पूर्व पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि. 20 जुलै 2023 ते 20 ऑगस्ट 2023 दरम्यान घरोघरी अधिकारी या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हातील सर्व मतदान केंद्रावर कार्यरत असलेल्या सर्व मतदान केंद्र अधिकारी यांनी प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांचे नाव तसेच त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे मतदार यादीत आहेत किंवा नाहीत याची तपासणी केली.ज्या नव मतदारांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केले आहेत अशा नवमतदारांचे मतदार यादीत नोंदविले, तसेच प्रत्येक मतदाराचा मतदार यादीती वैयक्तिक तपशील पत्ता यात काही दुरुस्ती असतील तर त्यासाठीचे अर्ज भरून घेण्यात आले.सोबतच लग्नानंतर नाव बदललेल्या स्त्री मतदारांचे नावे बदलून घेण्याची कार्यवाही करण्यात आली, स्थलांतरित झालेल्या मतदारांचे नव्या पत्त्याची नोंद करून घेण्याबाबतची मोहीम सुद्धा राबविण्यात आली. या कार्यक्रमात जिल्ह्यातील एकूण 15 लाख 54 हजार 515 मतदारांपैकी 15 लाख 48 हजार 970 मतदारांची पडताळणी करण्यात आली.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत पूर्व पुनरिक्षण उपक्रमातर्गत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे हे नमूद केले होते. त्यानुसार मतदान केंद्राच्या नावात बदल करणे, मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल करणे, ज्या मतदान केंद्राच्या ठिकाणी 1500 पेक्षा जास्त मतदार आहेत अशा मतदान केंद्राचे विभाजन करुन नवीन मतदान केंद्र तयार करणेबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिले होते.या अनुषंगाने दि. 18 आक्टोबर 2023 रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबई यांच्या कडून मतदान केंद्राच्या नावात बदल करणे, मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल करणे,नवीन मतदान केंद्रांना मंजुरी याबाबत आदेश प्राप्त झाले. यानुसार जिल्हात नवीन 49 मतदान केंद्र, 34 मतदान केंद्राच्या ठिकाणात बदल, 34 मतदान केंद्राच्या नावात बदल झाले असून आज रोजी जिल्हात एकुण 1699 मतदान केंद्र आहेत.
मतदार जनजागृती करण्यासाठी दि. 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक व माध्यमिक यांच्या संयुक्त विद्यमाने 3 लाख विद्यार्थांची मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली होती. तर अनुसूचित जातीच्या मतदार नोंदणीसाठी जिल्हात 82,अनुसुचित जमातीसाठी 49,विमुक्त जाती व भटक्या जमातीतील मतदार नोंदणीसाठी 44,दिव्यांग मतदार नोंदणीसाठी 9,तरुण मतदार नोंदणीसाठी 36,गणेशोत्सवादरम्यान 20,तर नवरात्रोत्सवादरम्यान 20 ठिकाणी विशेष शिबीरांचे आयोजन केले होते.
दि. 5 जानेवारी 2023 रोजीच्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदारसंख्या 1544834 इतकी होती. तर दि. 25 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्हातील मतदार संख्या 1554515 एव्हढी आहे. दि. 5 जानेवारी 2023 ते 25 ऑक्टोबर 2023 दरम्यान मतदार यादीत नवीन नावनोंदणीसाठीचा नमुना अर्ज क्रमांक 6 चे 27026 अर्ज प्राप्त झाले होते यापैकी 15987 नवमतदारांचा मतदार यादीत समावेश करुन घेण्यात आला आहे. तर विविध कागदपत्रे व अर्ज भरण्यातील त्रुटी यामुळे 2017 अर्ज नाकारण्यात आले आहेत. उर्वरित 9022 अर्जांवर निर्णय घेण्याची प्रक्रिया जिल्हातील पाचही मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून राबविली जात आहे. दि. 5 जानेवारी 2023 ते 25 ऑक्टोबर 2023 दरम्यान मतदार यादीत नवीन मतदार यादीतून मयत मतदार,स्थलातंरीत मतदार व दुबार नावे असलेल्या मतदारांची नावे वगळणीसाठीचा नमुना अर्ज क्रमांक 7 चे 9190 अर्ज प्राप्त झाले होते यापैकी 5378 अर्जांवर निर्णय घेण्यात येऊन ती नावे वगळण्यात आली. तर 1378 अर्ज नाकारण्यात आले. व 2434 अर्जांवर निर्णय घेण्याची प्रक्रिया जिल्हातील पाचही मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून राबविली जात आहे. दि. 5 जानेवारी 2023 ते 25 ऑक्टोबर 2023 दरम्यान मतदार यादीत नमुना क्रमांक 8 मतदार यादीतील मतदारांच्या तपशीलातील दुरुस्ती, विधानसभा मतदारसंघातर्गंत स्थलांतर दिव्यांग मतदारांची मार्किंग, मतदारांचे ओळखपत्र बदलण्यासाठी नमुना अर्ज क्रमांक 8 चे 13704 अर्ज प्राप्त झाले होते यापैकी 9944 अर्जांवर निर्णय घेण्यात आला. तर 730 अर्ज नाकारण्यात आले. व 3030 अर्जांवर निर्णय घेण्याची प्रक्रिया जिल्हातील पाचही मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून राबविली जात आहे.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, अंबडचे उपविभागीय अधिकारी दिपक पाटील, जालनाचे उप विभागीय अधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, भोकरदनचे उप विभागीय अधिकारी डॉ. दयानंद जगताप, मंठा तहसीलदार रुपा चित्रक, परतुर तहसीलदार प्रतिभा गोरे, घनसावंगी तहसीलदार श्रीमती योगिता खटावकर, अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके, जालना तहसीलदार छाया पवार, बदनापूर तहसीलदार सुमन मोरे, तहसीलदार संतोष बनकर, जाफ्राबाद तहसीलदार सारिका भगत यांच्यासह सर्व निवडणूक नायब तहसीलदार, ऑपरेटर परिश्रम घेत आहेत.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दि.27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या दावे व हरकतीच्या कालावधीतील मतदार नोंदणीसाठी आयोजित विशेष शिबिरात दि.5 ते 6 नोव्हेंबर 2023 रोजी 1699 मतदान केंद्रावर मतदारांच्या नोंदणीसाठी शिबीर, दि.25 व 26 नोव्हेंबर रोजी 1699 मतदान केंद्रावर मतदारांच्या नोंदणीसाठी शिबीर, दि.23 व 24 नोव्हेंबर 2023 रोजी जिल्ह्यातील 348 महाविद्यालयात महाविद्यालयीन तरुणांच्या नाव नोंदणीसाठी शिबीर, दि.2 व 3 डिसेंबर रोजी 1699 मतदान केंद्रावर दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी, तृतीय पंथी व्यक्ती, शरीर व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, भटक्या-विमुक्त जमातीसाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि.1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत 768 ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्राम विकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने राज्यभर विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात राज्यभरातील ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. अशी माहिती यावेळी देण्यात आली.