जालना (प्रतिनिधी) – जालना जिल्ह्यातून सर्वप्रथम रणजी ट्रॉफी खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवणारे प्राचार्य डॉ.रामलाल अग्रवाल यांनी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी घडविण्यासह दैदिप्यमान वाटचाल केली.उत्कृष्ट प्रशासक म्हणून प्रतिमा जपलेल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा सत्कार माझ्या हस्ते होत असल्याने विद्यार्थी म्हणून आपण भाग्यवान ठरलो अशा भावना आ.कैलास गोरंट्याल यांनी व्यक्त केल्या.
उर्मी ट्रस्ट राज्य काव्य पुरस्कारांचे वितरण,स्व.ना.धो.महानोर पुरस्कार , डॉ.रामलाल अग्रवाल यांचा विशेष सत्कार आणि उर्मी च्या रौप्यमहोत्सवी अंकाचे प्रकाशन शनिवारी ( ता.28) कोजागिरी पौर्णिमाच्या सायंकाळी ” दुधात सांडले चांदणे” हा सोहळा टाऊन हॉल स्थित डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झाला.यावेळी आ.कैलास गोरंट्याल ,ज्येष्ठ नेते ज्ञानेश्वर भांदरगे पाटील ,उर्मीचे संपादक कवीवर्य प्रा.जयराम खेडेकर, सीताबाई मोहिते,पुरस्कार प्राप्त कवयित्री प्रतिभा सराफ (मुंबई) सुरभी पाटील (पुणे )कविता बोरगावकर (माजलगाव )
कवी इंदर बोराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आ.कैलास गोरंट्याल यांनी उर्मीने मराठी कवितेत स्वतःची गौरवशाली परंपरा निर्माण केली असून कविवर्य प्रा. जयराम खेडेकर यांना आपले सदैव पाठबळ राहील अशी ग्वाही आ.गोरंट्याल यांनी दिली.
प्राचार्य डॉ.रामलाल अग्रवाल यांनी सत्कारास उत्तर देताना पन्नास वर्षांपूर्वीचे विद्यार्थी आजच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच आदर ,सन्मान करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. उर्मी च्या सत्काराने आपण भारावून गेलो अशी भावना डॉ.अग्रवाल यांनी विषद केली.उर्मी राज्य काव्य पुरस्कार प्रत्येकी पाच हजार रुपये रोख, गौरव पत्र कवयित्री प्रतिभा सराफ (मुंबई), सुरभी पाटील (पुणे ), यांना तसेच
स्व.ना.धो.महानोर पुरस्कार
कविता बोरगावकर (माजलगाव ) यांना 11000 रोख, प्रगतशील शेतकरी सीताबाई मोहिते यांना 5,000, रू.रोख,गौरव पत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी कवींनी महिला, बापलेक ,सावली, कातर वेली, आंबेमोहोर अशा एकापेक्षा एक बहारदार कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमास ज्ञानदेव पायगव्हाणे,प्रा. नारायण बोराडे, प्रा .मधुकर जोशी, सुभाष कोळकर ,सतीश जाधव, यांच्यासह रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
“कवितेचे गाव “म्हणून ओळख दिली : प्रा.खेडेकर
कवितेनेच आपल्याला भरभरून दिले असून साता समुद्रा पार उर्मी चे अंक जात आहेत. उद्यमशील, व्यापार नगरी असलेल्या जालना शहराला कवितेच्या पाडव्यासह कवी संमेलने, साहित्य पुरस्कार वितरण सोहळे या माध्यमांतून “कवितेचे गाव “म्हणून संपूर्ण मराठी मुलखात जालना शहराची ओळख निर्माण करून देण्यास आपण यशस्वी झालो. असा दावा प्रा.जयराम खेडेकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला. तथापि कवितेसाठीच आपले जीवन समर्पित असून ही सेवा अखेरच्या श्वासापर्यंत सुरू राहील. अशी भीष्माप्रतिज्ञा सुद्धा प्रा.जयराम खेडेकर यांनी याप्रसंगी केली.