जालना (प्रतिनीधी) – जालना येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न आ.कैलास गोरंटयाल यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर मार्गी लागला असून कन्हैय्यानगर परिसरात असलेली ३२ हेक्टर ३४ आर शासकीय जमिन निश्चित करून आज शुक्रवारी सदर जागेवर खुणा देखील रोवण्यात आल्या आहेत.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असतांना जालना येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाली होती.विशेष म्हणजे या नियोजित महाविद्यालयासाठी जालना शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या इंदेवाडी,खरपुडी येथील शासकीय जमिनीची पाहणी राज्य शासनाच्या वतीने पाठविण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली होती.आणि जागा उपलब्ध असल्याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला होता.मात्र,त्यानंतरच्या काळात राज्यात सत्तांतर होऊन शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आले.या सरकारने जालना येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अर्थसंकल्पात कोणतीही आर्थिक तरतूद न ठेवल्याने जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी,पावसाळी आणि अर्थसंकल्पिय अधिवेशनात सातत्याने आवाज उठवून आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारशी मोठा संघर्ष केला.अखेरीस राज्य सरकारने जालना येथील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मागील काही महिन्यांपूर्वी आर्थिक तरतूद मंजूर केली.मात्र,जागा निश्चित होत नसल्यामुळे सदर महाविद्यालय सुरू करण्यास विलंब होत आहे.जागा निश्चित करण्यासाठी देखील आ.कैलास गोरंटयाल यांनी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला.आ.कैलास गोरंट्याल यांचे अथक परिश्रम व पाठपुराव्यामुळे जालना जिल्ह्यातील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी अखेरीस कन्हैयानगर परिसरात असलेल्या शासकीय जागेची आज शुक्रवारी सकाळी पाहणी करून ३२ हेक्टर ३४ आर इतकी जमीन निश्चित करत क्षेत्रफळाच्या खुणा रोवण्यात आल्या आहेत.यावेळी आ.कैलास गोरंट्याल यांनी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महाविद्यालयाचे अधिक्षक अधिष्ठाता डॉ.सुनील चौधरी,वन परिक्षेत्र अधिकारी के.डी. नागरगोजे,वन सर्वेक्षक एस.एन. साबळे,महसुल विभागाचे मंडळ अधिकारी दुर्गेश गिरी,तलाठी पुरी,भूमी अभिमापक रमेश कदम,गणेश लोंढे,जिल्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख मेहमूद, दत्ता घुले,वनपाल एन.ए.राऊत, वनरक्षक घुगे,संजीवन शास्त्र शेख नदीम आदी कर्मचारी उपस्थित होते.
येत्या शैक्षणिक वर्षापासून कॉलेज सुरू करण्याचा प्रयत्न – आ.कैलास गोरंटयाल
जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आज शुक्रवारी जागा निश्चित करण्यात आली असली तरी इमारत बांधकाम आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बराच अवधी लागणार आहे.येत्या शैक्षणिक वर्षापासून कॉलेज सुरू करण्याचा आपला प्रयत्न असून त्यासाठी पर्यायी जागेचा शोध घेतला जात आहे.येत्या सोमवारी दोन ते तीन जागेंची पाहणी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह केली जाणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असे आ.कैलास गोरंटयाल यांनी सांगितले आहे.