जालना – प्रधानमंत्री आवास योजनेत जालना जिल्ह्याने 6 हजार 670 घरकुलांना देवून शंभर टक्के उदिष्ट्ये पूर्ण केल्याबद्दल जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा वर्षा मीना यांचा मुंबई येथे राज्य शासनाच्या वतीने राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महाआवास अभियान 2023-24 राज्यस्तरीय कार्यशाळेच्या शुभारंभ गुरुवारी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमात सन 2021-22 दरम्यान प्रधानमंत्री महा आवास योजने अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
जालना जिल्हा परिषदेने सदर वर्षात राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत जालना जिल्ह्याने 6 हजार 670 घरकुलाना मंजुरी देवून शंभर टक्के उदिष्ट्ये पूर्व करून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.तर 6 हजार 236 घरकुलांना मंजुरी देवून बुलडाणा जिल्ह्याने राज्यात दुसरा तर 3 हजार 507 घरकुलांना मंजुरी देवून जळगाव जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांक पटकावला आहे. जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अध्यक्षा वर्षा मीना यांचा ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरव केल्या बद्दल जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुख अधिकारी, कर्मचारी आणि जनतेतून अभिनंदन केले जात आहे.