मुंबई : महाराष्ट्र अस्थिर झाला असून गुप्तचर विभागाचं अपयश असून त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याची सडकून टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. 26/11 हल्ल्यातील शहीदांना वाहिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी राजकीय स्थितीवर भाष्य केले. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या आरक्षणवर कोणतंही विधेयक अधिवेशनात आलं तर आम्ही पूर्ण ताकदीने सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले.सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 26/11 भारतातील नवे तर जग काळा दिवस म्हणून बघतं. या योद्धांनी आपल्या कुटुंबाची काळजी न करता देशासाठी योगदान दिलं. 26/11 जग कधीच विसरणार नाही.
अंतरवाली सराटीमधील दगडफेकीतील संशयित आरोपी ऋषीकेश बेदरेला अटक करण्यात आल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी फोटो ट्विट करत शरद पवार गटावर टीका केली आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नितेश राणेंनी केलेला आरोप मी पाहिलेला नाही, त्यामुळे मी यावर बोलणार नाही. माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अनेकांसोबत फोटो आहे, याचा अर्थ आम्ही सगळ्यांना ओळखतोच असं नाही, असेही त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, एखादा आमदार आणि खासदारावर हल्ला होत असेल तर त्याचं अपयश गृह विभागाचं आहे.
मी फडणवीस यांचा राजीनामा मागते ते वैयक्तिक कारणासाठी नाही, भाजपच्या खासदारावर दगडफेक झाली यात अपयश फडणवीस यांचं नाही, पण नैतिक जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे, ते सरकारचं अपयश आहे.
सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, माझ्यासमोर बेरोजगारी आणि इतर समस्या भीषण असून मी त्यासाठी लढत आहे. महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण खराब होत असेल तर त्यासाठी सरकार जबाबदार आहे. सगळ्यांत मोठं आव्हान भीषण दुष्काळ आहे. ट्रिपल इंजिन खोके सरकार यावरून इतरांच लक्ष दूर करत आहे.
दुष्काळ, महागाई, बेरोजगारी या भीषण समस्या आहेत. दूध महाग झालं आहे, कांदा प्रश्न बिकट झाला आहे, शेतकऱ्यांना टॅक्स भरावा लागत आहे. दिल्ली सरकार आता भ्रष्ट जुमला भाजप सरकार आहे. वाजपेयी, सुषमा स्वराज यांची ओरिजिनल सुसंस्कृत भाजप आता जूमला पार्टी झाला असल्याची कडवट टीका त्यांनी केली. या देशात बाळासाहेब ठाकरे एकच होऊन गेले, त्यांच्या नावाच्या उपाध्या कोणी घेऊ शकत नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरवरून लगावला. प्रकाश आंबडकर या देशाचे एक मोठे नेते, ते इंडिया आघाडीत आल्यास त्यांचं स्वागत असेल, असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.