हिंगोलीतील रामलिला मैदानावर ओबीसी महासभा होणार आहे. या सभेला मराठा बांधवांचा विरोध पाहायला मिळत असून परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. याबाबत महत्वाची बातमी समोर आली असून छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंगोलीकडे जाताना छगन भुजबळ यांचा ताफा अडवण्यात आला असून ३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात हिंगोलीमध्ये ओबीसी महासभा होत आहे. हिंगोलीच्या रामलिला मैदानावर ही सभा होणार असून सभेला जाताना छगन भुजबळ यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
नांदेडच्या आर्धापुर तालुक्यातील पिंपळगाव येथे मराठा समाजाच्या तरुणांकडून भुजबळांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या ताफ्याला काळे झेंडेही दाखवले. पोलिसांनी या तरुणांना तात्काळ ताब्यात घेतले आहे.
दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांची ही सभा उधळून लावण्याचा इशारा स्वराज्य संघटनेने दिला होता. या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून नांदेड विमानतळ तसेच या सभेच्या ठिकाणीही पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
दरम्यान, जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी नेत्यांच्या पहिल्या सभेतून छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला होता. ज्यानंतर भुजबळ आणि जरांगे असा वाद पाहायला मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर भुजबळांच्या आजच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.