हिंगोलीतील ओबीसी मेळाव्यातून मंत्री छगन भुजबळांनी आरक्षणाच्या मुद्यावरून उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी सभेत भुजबळांनी जरांगे यांच्यावरही निशाणा साधला. तसेच सभेत हजारो ओबीसी बांधवांना संबोधित करताना भुजबळांनी सरकारला ओबीसी समाजाच्या मागण्या सांगितल्या. तसेच त्यांनी ‘शिंदे समिती ताबडतोब रद्द करण्याचीही मागणी भुजबळांनी केली. हिंगोलीतील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ म्हणाले, ‘मराठा समाजाला मतदान केलं नाही म्हणून जाळपोळ केली. गावबंदी केली, तेव्हा पोलीस काही करत नाही. यावर आपल्यालाच काही करावं लागेल. त्यांना दाखवावं लागेल. हम रुके हुये थे, थके हुये नही थे’.
‘तुम्ही एकत्र आले तर काय चमत्कार करु शकता. ग्रामपंचयत निवडणुकीत भाजप आली. ओबीसींचा आवाज बुलंद करा. बैठकीत मला बोलवा किंवा नका. पण आता मला आमदारकीची हौस नाही. मंत्रिपदाची हौस नाही. गरीब मराठा समाजाला आरक्षण द्या, पण आमच्यावर बुलडोझर नको, असंही ते म्हणाले.
भुजबळ यांनी सरकारकडे काय मागण्या केल्या?
‘सरकारकडून जे सार्थीला मिळालं, ते महाज्योतीला द्या. शिंदे समिती ताबडतोब रद्द करा. आधी नोंदी या एक हजार कुणबी नोंदी सापडल्या. आता लाखो सापडत आहेत. दोन महिन्यात मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्राला स्टे द्या. मराठा समाजाचं एकट्याचं सर्वेक्षण चालणार नाही. सर्वांचं सर्वेक्षण करा. मग इतरांपेक्षा मागास असेल तर द्या, अशा मागण्या भुजबळांनी केल्या.
‘मंडल आयोगाने सांगितलं की, आम्ही ५४ टक्के आहोत. बावनकुळे, शरद पवार , अजित पवार म्हणत आहेत की, जनगणना करा. एकदाची जनगणना करा. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. बिहार जातनिहाय जनगणना करु शकतो, तर महाराष्ट्र का नाही? असा सवाल देखील भुजबळ यांनी उपस्थित केला.