जालना – जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी तलावाला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज भेट देऊन तलावातील पाणीपातळी, गाळ, सुरक्षा विषयक बाबी यांची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर उद्योजक तथा समस्त महाजन ट्रस्टचे सुनील रायठठ्ठा, शिंदे, मांडवा गावचे सरपंच खरात, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
चालू वर्षात कमी पडलेल्या पावसामुळे घाणेवाडी तलावातील पाण्याचा अपव्यय न होता योग्य वापर व्हावा या दृष्टीने तलावाची आवश्यक ती दुरुस्ती तातडीने करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी आयुक्तांना केली. तर तलावात साठलेला गाळ हा प्रशासन व समस्त महाजन ट्रस्टच्या सहकार्याने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन कऱण्यात येईल, असे सांगून जिल्हाधिकारी यांनी सांडव्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडे पाठवलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा तातडीने करण्यात यावा. तलावाच्या बाजूने वाढलेली झाडेझोडपे काढण्यात यावी. तसेच आयसीटीच्या मदतीने तलावातील पाण्याच्या नमुन्याची तपासणी करण्याची सूचना केली. तलावाच्या सुरक्षा विषयक बाबींचाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी आढावा घेतला.