अंबड – जालना जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. अंबड घनसावंगी व जालना तालुक्यातील अनेक मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या नैसर्गिक संकटामुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल पाठवावा, अशी मागणी भाजप नेते तथा समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी
केली आहे.
घनसावंगी मतदारसंघातील कुंभार पिंपळगाव, तिर्थपुरी, अंतरवाली तर अंबड तालुक्यातील जामखेड, रोहिलागड, गोंदी, वडीगोद्री या महसुली मंडळात अतीवृष्टी झाल्याने शेतीपिके आडवे झाले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा ऊसही आडवा झाला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचेही पावसामुळे नुकसान झाले आहे. खरीप हंगामात अुपऱ्या पावसामुळे नापीकिला सामोरे जावे लागलेल्या शेतकऱ्यांना या संकटात मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे या नुकसानीचे महसूल विभागाने तातडीने पंचनामे करून मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठवावा, अशी मागणी सतीश घाटगे यांनी केली आहे