कच्चे घर असलेल्या व बेघर असलेल्या कुटुंबांना घरकुलासाठी पाच लाखाचे घरकुल द्या व अंगणवाडी कर्मचारी, आशा, गटप्रवर्तक व शालेय पोषण आहार कामगारांना किमान 26 हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी आज सिटू व शेतमजूर युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आलंय.
जालना जिल्ह्यातील कच्चे घर, बेघर असलेल्या कुटुंबांना अजून पर्यंत त्यांच्या हक्काचं घर मिळालेलं नाही. घर मिळण्यासाठी अनेक मजुरांनी कामगारांनी वारंवार संबंधित अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन, मोर्चा आंदोलन, लेखी निवेदनं दिलेली आहेत. परंतु अजून पर्यंत त्या कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे घरकुल देण्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. तसेच अंगणवाडी कर्मचारी, आशा, गटप्रवर्तक व शालेय पोषण आहार कामगारांना किमान वेतन 26 हजार रुपये देऊन त्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा देण्यात यावा. 2021 पासून ऑनलाईन केलेले संजय गांधी निराधार योजनेचे पात्र अर्ज मंजूर करून देखील लाभ देण्यास दिरंगाई करणार्या अधिकार्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चाला संबोधीत करण्यासाठी जिल्हा परिषदेसमोर कामगारांची सभा घेण्यात आली. यावेळी कामगार नेते कॉ.अण्णा सावंत, सिटू चे जिल्हाध्यक्ष कॉ. मधुकर मोकळे, शेतमजूर युनियनचे राज्य अध्यक्ष कॉ. मारुती खंदारे, जिल्हाध्यक्ष सरिता शर्मा, कांता मिटकरी, सिटू चे जिल्हा सचिव अॅड. अनिल मिसाळ, कांचन वाहुळे यांची भाषणे झाली. यावेळी साजदा सय्यद, मिरा बोराडे, रवी भदर्गे, भगवान कोळे, बंडू कणसे, प्रभाकर कुलकर्णी, मथुरा रत्नपारखे, वृषाली इंगळे, छाया जैस्वाल, चंपाबाई दाभाडे, यादवराव डीघे, बाबासाहेब पाटोळे, राही वाघ, गयाबाई वाघ, दगडाबाई पितळे, सुनंदा पवार, यमुना गिरी, छाया साबळे, स्वाती गोसावी, अब्दुल पठाण, नानाबाई चव्हाण यांच्यासह हजारो कामगार मोर्चात सहभागी झाले होते.