छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शहरात एकाचवेळी ११ ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. तब्बल २०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून ही छापेमारी करण्यात आली आहे. शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. आयकर विभागाने अचानक धाडी टाकताच शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशासह महाराष्ट्रात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडसत्र सुरू केलं आहे. अनेक बडे उद्योगपती तसेच बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी केली जात आहे. बुधवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरातील ११ ठिकाणी आयकर विभागाने एकाच वेळी धाडी टाकल्या.
नाशिक आणि पुणे आयकर विभागाच्या टीमने ही छापेमारी केल्याची माहिती आहे. शहरातील बडे बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचं समजते. या व्यावसायिकांच्या कार्यालयात आणि घरात आयकर विभागाचे अधिकारी ठाण मांडून बसल्याची माहिती आहे.
दरम्यान, कारवाई नेमकी कोणावर करण्यात आलीय याची माहिती मात्र अद्याप समजू शकलेली नाही. आयकर विभागाने सुरू केलेली ही छापेमारी पुढील दोन ते तीन दिवस चालणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.