घनसावंगी – तालुक्यातील साकळगावाला हिवाळ्यातच पाणी टंचाई निर्माण झालेली असताना ग्रामपंचायत कोणत्याही उपाय योजना करण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे शनिवारी संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून तीव्र शब्दात ग्रामसेवक व सरपंचावर नाराजी व्यक्त केली.
पावसाळ्यात पूस कमी झाल्याने गावातील नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडले आहे. हिवाळ्यातच पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात या गावातील कुटुंबाचे पाण्यासाठी अधिकच हाल होणार आहे. सध्या पाण्यासाठी महिला व लहान मुलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. गावच्या पाण्याच्या समस्येचे निराकरण करण्याची मागणी करूनही सरपंच व ग्रामसेवक उपाययोजना करत नसल्याने गावकऱ्यानी गटविकास अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतरही गावच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे महिला व पुरुष व गावातील युवकांनी पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयार धडक हंडा मोर्चा काढला. हंडा मोर्चाची माहिती देऊनही निवेदन घेण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक कार्यालयात आले नाही.महिला आंदोलकानी तीव्र नाराजी व्यक्त करत सरपंच व ग्रामसेवक यांचा निषेध केला. या वेळी पुष्पा सुरासे,पुजा काळे,गोधाबाई शिकारे, मथुराबाई गाडेकर, चंद्रकला अंबेगावकर, रमेश जाधव, भगवान राऊत,नाना शिकारे, दता वाळके, सोपान चव्हाण उपस्थिती होते.