जालना – माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांच्या कारवर हल्ला झाल्याची घटना आज, शनिवारी घडली. पाच ते सहा जण दुचाकीवरून आले होते. हल्लेखोरांनी लाठीहल्ला आणि दगडफेक केली. माजी मंत्री तथा शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. राजेश टोपे यांच्या गाडीवर काही वेळापूर्वी दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. अज्ञात तरुणांनी टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यानंतर घोषणाबाजी केल्याचे समोर येत आहे.
जालना येथील जिल्हा मध्यवर्ती बँकच्या खाली उभा असलेल्या राजेश टोपे यांच्या गाडीवर ही दगडफेक झाली आहे. दरम्यान, या घटनेत टोपे यांच्या गाडीच्या काच्या फुटल्या असून, गाडीजवळ एक लाकडी दांडा आणि ऑइलची बॉटल देखील सापडलेली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या वादातून ही दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस दाखल झाले असून, याची माहिती मिळताच टोपे समर्थक देखील घटनास्थळी जमा झाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकच्या निवडणुका सुरु असल्याने टोपे हे बँकेत आले होते. दरम्यान, याचवेळी बाहेर उभी असलेल्या त्याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. आता पोलिसांकडून सीसीटीव्हीची पाहणी करून दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जाण्याची शक्यता आहे. तर, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होत असून, त्याच वादातून ही दगडफेक झाली असल्याचे टोपे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.