मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला अवघे दोन दिवस उरलेत. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षणाचा निर्णय न झाल्यास थेट मुंबईत मोर्चा घेऊन धडकणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे पाटलांच्या या इशाऱ्याची पोलीस प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार पोलिसांनी ट्रॅक्टर चालकांना नोटीसा पाठवल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, २४ डिसेंबरनंतर थेट मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा आरक्षणासाठी येत्या 24 डिसेंबर रोजी मुंबईत मराठा समाज मोठया संख्येने जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हयातील कंधार पोलीसांनी ट्रॅक्टर चालकांना नोटीसा पाठवल्या आहेत.
मराठा नेते, कार्यकर्ते आपल्याकडे ट्रॅक्टर मागण्यासाठी आले तर देऊ नये , किंवा आपण स्वतः ट्रॅक्टर सोबत घेऊन जाऊ नये अशा आशयाची नोटिस पोलीसांनी दिली आहे. ग्रामीण भागातून मराठा बांधव ट्रॅक्टर घेउन मुंबईला जातील अशी शक्यता असल्याने ट्रॅक्टर चालकांना या नोटीसा देण्यात आल्या आहेत.
ट्रॅक्टर घेऊन गेल्यास वाहतुकीस अडथळा , लोकांची गर्दी होईल, त्यांच्याकडून जाळपोळ, गाडया फोडणे असे अनुचित प्रकार घडू शकतात. तस काही झाल्यास आपल्याला जबाबदार धरून कारवाई करुन ट्रॅकटर जप्त केल जाईल असा इशाराही या नोटीसीमधून देण्यात आला आहे.
दरम्यान, २४ डिसेंबरच्या डेडलाईन पूर्वीच जरांगे पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होत आहे. त्यासाठी आज गिरीश महाजन, उदय सामत, संदीपान भुमरे हे जालन्यामध्ये जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.